
नागपूर(Nagpur)/वर्धा(Wardha),दि. 12 मार्च 2026: आर्थिक वर्षाचा समारोप होत असताना नागपूर परिमंडळाला पूर्णपणे थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणने आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. थकीत वीजबिलांचा डोंगर कमी करण्यासाठी प्रशासनाने कठोर अशी भूमिका घेतली असून, नागपूर व वर्धा जिल्ह्यातील थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तातडीने खंडित करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे, केवळ वीज कापणेच नव्हे, तर वीज कापल्यानंतर अनधिकृतपणे ती पुन्हा जोडणाऱ्या ग्राहकांवर आता थेट पोलिसांत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे कठोर आदेश देण्यात आले आहेत.
वरिष्ठ अधिकारी व विशेष पथके मैदानात महावितरणचे नागपूर परिमंडळ सध्या पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’वर असून खुद्द वरिष्ठ अधिकारी रणधुमाळीत उतरले आहेत. मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता अमित परांजपे, संजय वाकडे आणि स्मिता पारखी यांच्यासह नागपुर आणि वर्धा जिल्ह्यातील तांत्रिक, लेखा व मानव संसाधन विभागातील महिला व पुरुष अधिकारी-कर्मचाऱ्यांची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. कार्यकारी अभियंता स्वतः प्रत्येक विभागात थकबाकीदारांच्या भेटी घेऊन त्यांना थकीत देयके भरण्याचे शेवटचे आवाहन करत आहेत. एकदा वीज कापल्यानंतर थकबाकीच्या संपूर्ण रकमेसह ‘पुनर्जोडणी शुल्क’ (Reconnection Fee) भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही, असे महावितरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सुट्टीच्या दिवशीही केंद्रे खुली; रांगेत उभे राहण्याचे टेन्शन नाही, ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणने सकारात्मक पाऊल उचलले आहे. मार्चअखेरपर्यंत शनिवार, रविवार आणि इतर सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे पूर्णवेळ सुरू राहतील. यामुळे नोकरदार आणि व्यावसायिकांना सुट्टीच्या दिवशीही आपली देयके भरता येतील. याव्यतिरिक्त, www.mahadiscom.in हे संकेतस्थळ, महावितरणचे मोबाईल अॅप आणि ‘महा पॉवर पे’ वॉलेट यांसारखे ऑनलाइन पर्याय 24 तास उपलब्ध आहेत. यात क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व ऑनलाइन माध्यमांतून केला जाणारा भरणा पूर्णपणे निःशुल्क आहे.
बिलात सवलत मिळवण्याची संधी: प्रामाणिकपणे बिल भरणाऱ्या ग्राहकांनी ऑनलाइन भरणा केल्यास दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत बिलामध्ये 0.25 टक्के सवलत मिळते. तसेच बिलाची रक्कम मुदतीपूर्वी (Prompt Payment) भरल्यास अतिरिक्त 1 टक्का सवलत दिली जाते. ग्राहकांनी या सवलतींचा लाभ घेऊन थकीत बिलांचा निपटारा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कडक इशारा: महावितरणने थकबाकीदारांना शेवटचा इशारा दिला आहे की, वीज कापल्यानंतर जर कोणीही परस्पर किंवा चोरून वीज जोडली, तर अशा प्रकरणांत कोणतीही दयामाया न दाखवता थेट वीज चोरीचे गुन्हे दाखल केले जातील. “अखंडित वीजपुरवठा हा ग्राहकांचा हक्क असला तरी वेळेवर बिल भरणे हे सामाजिक कर्तव्य आहे,” असे मत व्यक्त करत प्रशासनाने या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मार्चअखेरपर्यंत ही धडक कारवाई अशीच सुरू राहणार असल्याने वीज ग्राहकांनी तातडीने आपली थकबाकी भरून कटू कारवाई टाळन्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
थकीत वीज बिल वसुली मोहीमेवरील महावितरणचे अधिकारी व कर्मचारी

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर














