

जयकमल कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू, एक जखमी
नागपूर – शहरातील महाल परिसरातील जयकमल कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर सध्या मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्राथमिक माहितीनुसार, कॉम्प्लेक्समध्ये फळांना पिकविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्वलनशील पदार्थांचा साठा होता. त्यामुळे आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या ज्वलनशील पदार्थामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केलं आणि परिसरात प्रचंड लोट उसळला.या दुर्घटनेत तीन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी तब्बल तीन तासांची मशक्कत करावी लागली. अखेर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.घटनेची चौकशी सुरू असून आग कशामुळे लागली याचा अधिकृत खुलासा अद्याप झालेला नाही. महाल हा परिसर बाजारपेठ तसेच दाट वस्तीचा असल्याने या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.