
ज्येष्ठ महिला समूह नृत्यनाटिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण थाटात
नागपूर(Nagpur), ९ मार्च :
आपल्या भारतीय संस्कृतीत ‘माता’ आणि ‘माती’ या दोन गोष्टी नवनिर्मिती करतात. माता म्हणजे स्त्री, जिला नवनिर्मितीचे वरदान ईश्वराने दिले आहे. आणि दुसरी म्हणजे माती—ज्यात बीज पेरले की अंकुर फुटतो. म्हणून प्रत्येक स्त्रीला अभिमान वाटायला हवा की ती नवनिर्मिती करू शकते, पुढच्या पिढीला उत्तम संस्कार देऊ शकते. प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव ठेवून आत्मविश्वासाने आयुष्य जगावे, असे उद्गार कांचन गडकरी यांनी काढले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूर आणि तेली समाज सभेच्या वतीने “मातृत्व आणि कर्तृत्व स्वामिनी तुला प्रणाम” या संकल्पनेवर आधारित जागतिक महिला दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम ‘संताजी सभागृह’, बुधवार बाजार, सोमवारी क्वार्टर्स, नागपूर येथे पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कार भारतीच्या प्रदेश अध्यक्षा कांचन गडकरी होत्या तर धरमपेठ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षा सारिका पेंडसे यांची विशेष उपस्थिती होती. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे विश्वस्त अशोक मानकर, डॉ. संजय उगेमुगे,ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूर चे सचिव डॉ. राजु मिश्रा, तेली समाज सभेचे अध्यक्ष नानाभाऊ ढगे, कोषाध्यक्ष हरिभाऊ किरपाने, सचिव सुरेश साठवणे, नृत्यनाटीका स्पर्धेच्या परीक्षक सुजाता नागपुरे व निकिता ढाकुलकर यांची देखील उपस्थित होती.
या कार्यक्रमात बालकल्याणच्या सभापति सारिका नंदुरकर, नगरसेविका मंगल मस्के, प्राचार्य डॉ. शुभा मिश्रा, प्रशासकीय सेविका अर्चना श्रीवास्तव या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला तसेच ज्येष्ठ महिलांसाठी समूह नृत्यनाटिका स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके वितरीत करण्यात आले.
महिलांनी एकमेकींना साथ देत प्रोत्साहन दिल्यास समाजात महिलांचे स्थान अधिक मजबूत होईल. त्यामुळे महिलांनी एकत्र येऊन प्रगतीचा मार्ग स्वीकारत एकमेकींना पुढे नेण्याचा संकल्प करावा. ”असे प्रतिपादन सारिका पेंडसे यांनी केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंगला गावंडे यांनी केले तर प्रास्ताविक दिलीप कातरकर आणि आभारप्रदर्शन वंदना वारके यांनी केले.
…….
पारितोषिक विजेते महिला मंडळ….

प्रथम – छत्रपती जेष्ठ नागरिक मंडळ छत्रपती नगर नागपूर,
द्वितीय – श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक मंडळ मनीष नगर नागपूर,
तृतीय – राणी झाशी महिला मंडळ मानेवाडा नागपूर उत्तेजनार्थ प्रथम – संघर्ष महिला मंडळ लोकसेवा नगर नागपूर,
उत्तेजनार्थ द्वितीय – मुक्ताई महिला भजन मंडळ खरबी रोड नागपूर.















