श्री. एम यांचे व्याख्यान 10 मार्च रोजी

0

स्‍व. दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दीनिमित्त आयोजन

नागपूर, (Nagpur)7 मार्च
विद्यार्थी व युवकांचे प्रेरणास्‍थान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या राष्‍ट्रव्‍यापी संघटनेच्‍या स्‍थापना काळातील अग्रणी स्‍व. दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष विविध कार्यक्रमांनी साजरे करण्यात येत आहे. याच श्रृंखलेत रविवार, 10 रोजी ‘भारत की संकल्पना’ या विषयावर आध्यात्मिक गुरू, शिक्षणतज्‍ज्ञ, समाजसुधारक, लेखक, जागतिक वक्‍ते पद्मभूषण श्री. एम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात संध्याकाळी 6 वाजता होणार्‍या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्‍व. दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समितीचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार आहेत. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांची प्रमुख उपस्थिती राहील.
श्री. एम हे नाथ संप्रदायाशी निगडीत असून त्‍यांनी गुरू महेश्‍वरनाथ बाबाजी सोबत ह‍िमालयात भ्रमंती केलेली आहे. त्‍यानंतर त्‍यांनी महान शिक्षकांकडून परंपरा आणि ग्रंथांचे शिक्षण घेतले. आध्यात्मिक साधकांकरिता त्‍यांनी सत्संग फाऊंडेशनची स्थापना केली असून सर्व धर्मांचा, परंपरांचा अभ्‍यास असलेल्‍या श्री एम यांनी शांती आणि सद्भावनेचा प्रचार, प्रसार करण्याकरिता कन्‍याकुमारी ते काश्‍मीरपर्यंत 15 महिने, 11 राज्‍यांतून 7500 किलोमीटरचा प्रवास करत केला आहे. सामाजिक योगदानासाठी त्‍याना अनेक पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले असून 2020 साली भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरविले आहे.
अशा या थोर आध्‍यात्मिक गुरूंच्‍या वाणीचा लाभ घेण्‍यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्‍व. दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समितीचे सचिव अजय संचेती, उपाध्यक्ष अरुण लखानी यांच्‍यासह संयोजक आ. डॉ. रामदास आंबटकर, डॉ. उपेंद्र कोठेकर, डॉ. मुरलीधर चांदेकर, प्रा. अनिल सोले, अ‍ॅड. सुनील पाळधीकर, प्रा. नारायण मेहरे, भूपेंद्र शहाणे, विनय माहूरकर, डॉ. चंद्रशेखर भुसारी, प्रा. रवींद्र कडू, विजय जाधव, जयंत पाठक, विक्रमजीत कलाने, अजय चव्हाण, अलका करमरकर, डॉ. मनीषा कोठेकर, प्रा. नितीन गुप्‍ता, पायल किनाके यांनी केले आहे.