झिरो माईल स्टोनचे पर्यटनाच्या दृष्टीने मनपा करणार सौंदर्यीकरण आणि विकास

0

हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत निर्णय: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन सीएसआर

निधीतून अर्थसहाय्य करणार

नागपूर (Nagpur) भारताच्या केंद्रस्थानी असलेले ग्रेड -१ हेरिटेज झिरो माईल स्टोनचा पर्यटनाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका सौंदर्यीकरण आणि विकास करणार, असा महत्वपूर्ण निर्णय हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हेरिटेज संवर्धन समितीचे अध्यक्ष श्री. अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (ता.१२) मनपामध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, समितीच्या सदस्य सचिव श्रीमती लीना उपाध्ये आणि तज्ञ सदस्य उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्री यांचे सल्लागार श्री. आनंद बंग आभासी पद्धतीने बैठकीमध्ये सहभागी झाले. या प्रकल्पासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन सीएसआर निधीतून अर्थसहाय्य करणार आहे.

नागपूर महानगरपालिकेतर्फे वास्तू शिल्पकार श्री. परमजीत सिंग आहुजा यांनी झिरो माईलच्या विकासा संदर्भातील प्राथमिक स्वरूपाचा आराखडा तयार केला असून त्यांनी या प्रारूपाची मांडणी सभेत केली. त्यांनी सांगितले की, झिरो माईल लगतच्या जागेवर भूमिगत ग्रेट ट्रिग्नॉमेट्रीकल सर्वे चे संग्रहालय स्थापित केले जाईल. तसेच मनपाच्या जागेवर पार्कींग आणि पर्यटकांसाठी इतर व्यवस्था केली जाईल. येथे भेट देणाऱ्या नागरिकांसाठी ॲम्पिथिएटर तसेच फूड कोर्टचा सुद्धा प्रस्ताव त्यांनी दिला त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे येतील, हेरिटेज संवर्धन समितीचे कार्यालय सुद्धा तिथे राहणार आहे. असेही त्यांनी सांगितले.

बैठकीतील चर्चेनुसार या प्रकल्पाला इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सीएसआर निधीतून विकास कामात सहकार्य करणार आहे. नागपूरसाठी हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प असून, महानगरपालिका तर्फे सदर झिरो माईल पर्यटनक्षेत्राचा विकास होईल असे मनपा आयुक्तांनी आश्वस्त केले. सध्या झिरो माईलच्या संवर्धनाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे. सभेत संवर्धन समितीच्या सदस्यांनी सुद्धा आपले मत मांडले. त्यांच्या सल्लानुसार झिरो माईलच्या विकास आरखड्यात बदल करून मा. मुख्यमंत्री यांचे समोर सादरीकरण करण्यात येईल, असे मनपा आयुक्तांनी सांगीतले.

बैठकीत नगर रचना विभागाचे  सहसंचालक श्री. विजय शेंडे, केंद्रीय पुरातन सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक श्री. सतीश मल्लिक, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक श्री. मयुरेश खंडागळे, डॉ. मधुरा राठोड, डॉ. शुभा जोहरी, सर्वे ऑफ इंडियाचे भूपेन्द्र परमार, मनपा अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, मनपा नगर रचना विभागाचे उपसंचालक श्री. किरण राऊत, सहायक संचालक नगर रचना श्री. ऋतुराज जाधव उपस्थित होते.