महा मेट्रो वर्धा रोड डबल डेकर व्हाया-डक्टला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान

0

• जगभरातील मेट्रो श्रेणीतील सर्वात लांब डबल डेकर वाया-डक्ट घोषित

नागपूर: नागपूर प्रकल्प राबवताना अनेक विक्रम स्थापित करणाऱ्या, महा मेट्रोने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. महा मेट्रो नागपूरच्या वर्धा रोड डबल डेकर व्हाया-डक्टची संपूर्ण
जगात मेट्रो श्रेणीतील सर्वात लांब डबल डेकर म्हणून अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या 3.14 किमी लांबीच्या डबल डेकर व्हाया-डक्टला आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये या आधीच मानांकन मिळाले आहे. आशिया खंडातील सर्वात लांब डबल डेकर व्हाया-डक्ट असल्यासंबंधीची मान्यता महा मेट्रोला या दोन संस्थांकडून या आधी मिळाली आहे.

येत्या मंगळवारी म्हणजे 6 डिसेंबर 2022 रोजी मेट्रो भवन येथे आयोजित कार्यक्रमात महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांना या संबंधीचे प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. लंडन येथे मुख्यालय असलेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे एकजुडिकेटर श्री ऋषी नाथ हे डॉ दीक्षित यांना प्रमाणपत्र प्रदान करत त्यांचा सत्कार करतील.

वर्धा रोडवरील डबल डेकर व्हाया-डक्ट प्रकल्प राबविणे एक मोठे आव्हान होते. हा 3-स्तरीय संरचनेचा भाग आहे ज्याच्या वरच्या बाजूला मेट्रो रेल्वे, मध्यम स्तरावर महामार्ग उड्डाणपूल आणि जमिनीच्या पातळीवर विद्यमान रस्ता आहे. 3.14 किमीचा डबल डेकर व्हायाडक्ट ही जगातील कोणत्याही मेट्रो रेल्वे प्रणालीतील सर्वात लांब संरचना आहे.

महा मेट्रोने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (GWR) अंतर्गत नोंद होण्यासाठी अर्ज केला होता. GWR च्या देशातील प्रतिनिधीने त्याचा पाठपुरावा केला आणि या विषयाशी संबंधित आपल्या टीमसोबत
या प्रस्तावावर सविस्तर अभ्यास केला. त्यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने महा मेट्रो चा दावा मान्य करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देण्याची घोषणा केली.

या अतिशय मानाच्या आणि विश्वप्रसिद्ध रेकॉर्डसाठी महा मेट्रोच्या प्रकल्पाची निवड होणे ही अभिमानाची बाब आहे. नजीकच्या काळात महा मेट्रो या सारखे आणखी काही विक्रम कायम करणार आहे यात शंका नाही. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ची मान्यता मिळणे हे महामेट्रो नागपुरातील प्रकल्प किती उत्कृष्टपणे राबवत आहे याचे खरे द्योतक आहे.

या आधी महा मेट्रोला केवळ सर्वात लांब डबल डेकर व्हाया-डक्टसाठी नव्हे तर या शिवाय डबल डेकर व्हाया-डक्टवर बांधलेल्या सर्वात जास्त मेट्रो स्टेशनसाठी आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डतर्फे मानांकन मिळवले आहे. इथे हे नमूद करणे महत्वाचे आहे कि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी 10 जुलै 2022 रोजी कन्व्हेन्शन सेंटर, एयरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात या दोन्हीही दोन रेकॉर्डसाठी डॉ दीक्षित यांना प्रमाणपत्रे प्रदान करत त्यांचा सत्कार केला होता.

त्याचप्रमाणे, उल्लेखनीय आहे कि 2017 मध्ये आणखी एका वेगळ्या विक्रमाकरता महा मेट्रो नागपूरची निवड आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स करता झाली होती. मार्च 2017 मध्ये महा मेट्रोला `कामाच्या ठिकाणी सुरक्षा’ (सेफ्टी ऍट वर्क) संकल्पनेला प्रोत्साहन देण्याकरता सर्वात मोठ्या मानवी साखळीचे आयोजन केले होते आणि या करता महा मेट्रोला या दोन्ही संस्थांचे मानांकन मिळाले होते.

मानवी साखळीत सहभागी कामगार, पर्यवेक्षक, व्यवस्थापक आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता. स्थापनेपासूनच, महा मेट्रोने अनेक स्तरांवर आणि व्यासपीठावर आजवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. या यापुढे देखील नागपूरकरांच्या सहकार्याने हा प्रवास असाच सुरु राहील हा विश्वास महा मेट्रोला आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा