नागपूर :प्रत्येक व्यक्ती स्वत:ला आनंद मिळावा म्हणून कार्य करीत असतो. मी देखील येथे आनंद मिळावा म्हणूनच आलो आहे. पण भाषण करण्यापेक्षा नाटक, सिनेमामध्ये काम करण्यात मला खरा आनंद मिळतो. त्यामुळे पुढील वर्षी या ( khasdar sanskrutik mhotsav ) खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या मंचावर कार्यक्रम सादर करायला मी पुन्हा येईल, असा विश्वास प्रसिद्ध अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांनी व्यक्त केला. (nana patekar)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या मध्य भारतातील सर्वात मोठ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे शुक्रवारी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. याप्रसंगी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सांस्कृतिक कार्य व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खा. डॉ. विकास महात्मे, आ. नागो गाणार, आ. मोहन मते, कांचनताई गडकरी, पुनीत आनंद, संजय गुप्ता, अरुण यादव, सुमीत पांडे, डॉ. गिरीश गांधी, डॉ. दीपक खिरवडकर, गिरीश व्यास, प्रवीण दटके, प्रा. संजय भेंडे, प्रशांत उगेमुगे, सुधाकर कोहळे, उपेंद्र कोठेकर, अॅड. सुलेखा कुंभारे यांची उपस्थिती लाभली. ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांची आभासी उपस्थिती लाभली.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याप्रमाणे नितीन गडकरी हे लेखक, कवी, गायक अशा कलाकारांमध्ये रमणारे आहेत. ते सर्वस्पर्शी आहेत. त्यांना रस्ते बांधण्यात आनंद मिळतो आणि म्हणूनच आपण त्यांनी बांधलेल्या रस्त्यांवरून आपल्या आप्तांना भेटू शकतो. त्यातून संवाद निर्माण होतो. हा सांस्कृतिक महोत्सव म्हणजे निव्वळ मनोरंजन नसून सर्व जातीधर्माच्या लोकांमध्ये संवाद निर्माण करणारा उत्सव आहे, असे नाना पाटेकर म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक मंत्री नसतानाही देशात सर्वात उत्तम सांस्कृतिक कार्य नितीन गडकरी हे एकमेव मंत्री असून त्यांच्या या महोत्सवामुळे लोकांचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ वाढला आहे, असे ते म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील नितीन गडकरी यांचे आरोग्य, शिक्षण, कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातील कार्य अतुलनीय असल्याचे सांगितले. पुढील पन्नास वर्ष नितीन गडकरीच खासदार असावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
नाना पाटेकर यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते तर ‘मां भारती की यशोगाधा – वंदेमातरम’ कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन करणारे शैलेश दाणी व अरविंद उपाध्याय यांचा नितीन गडकरी व नाना पाटेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. अनिल सोले यांनी प्रास्ताविकातून महोत्सवाची रुपरेषा सांगितली. सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी तर आभार प्रदर्शन बाळ कुळकर्णी यांनी केले.
महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्य बाळ कुळकर्णी, सारंग गडकरी, अविनाश घुशे, हाजी अब्दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, अॅड. नितीन तेलगोटे, विलास त्रिवेदी, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील, मनीषा काशिकर यांचे सहकार्य लाभत आहे.
प्रतिभांना प्रोत्साहन देण्यासाठी हा महोत्सव – नितीन गडकरी
समाजातल्या सर्व स्तरातील लोकांना आनंदात सहभागी करून घेणे, त्यांच्यातील प्रतिभेला प्रोत्साहन देणे, हा या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा उद्देश असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. संगीत, नृत्य, नाटक, साहित्य, कविता, अशा सर्व कलांचा समावेश असलेल्या या महोत्सवात स्थानिक ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार सहभागी होत आहेत, असे ते म्हणाले.
नव्या पिढीसाठी हा सांस्कृतिक वारसा – सद्गुरू जग्गी वासुदेव
देश अमृत महोत्सव साजरा करीत असताना इतक्या मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणे म्हणजे विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृती, परंपरेची जपणूक करण्याचा उत्तम प्रयत्न नितीन गडकरी करीत आहेत. आपली संस्कृती नष्ट होऊ नये, नव्या पिढीपर्यंत हा सांस्कृतिक वारसा पोहोचावा, यासाठीचे हे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सद्गुरू जग्गी वासुदेव आपल्या आभासी संदेशात म्हणाले.
जय भारती… जय भारती…
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्थानिक कलाकारांनी ‘मॉं भारती की यशोगाधा – वंदेमातरम्’ हा संगीत, नृत्य नाटक, वादन, गायन अशा सर्व कलांचा समावेश असलेला बहुरंगी कार्यक्रम उद्घाटन कार्यक्रमानंतर सादर केला. 25 हजार चौ. फूट मंचावर 1200 कलाकारांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाने रसिकांना रोमांचित केले.
‘जय भारती… जय भारती’ या सामूहिक गायन, वादन व नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंचावरील आगमनाने उपस्थितांची छाती अभिमानाने भरून आली. देशाचा स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांचे बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिकांच्या तसेच, इतिहासातील थोर पात्रांचे नाट्य सादरीकरण, मन मोहून टाकणारी नृत्ये, जबरदस्त ढोलताशा पथक व अशाच आपल्या संस्कृतीची ओळख करून देणा-या अनेक घटनांना गीतांमध्ये सुरेख पद्धतीने गुंफत सादरीकरण करण्यात आले.
डॉ. मनोज साल्पेकर यांनी कार्यक्रमाची संहिता लिहिली होती तर सारंग जोशी, देवेंद्र बेलणकर, स्वाती भालेराव, योगेश हटकर, कौस्तुभ दीक्षित, डॉ. देवेंद्र यादव, रघुनंदन परसटवार, शिरीष भालेराव, वैभव गाडगे, परिमल जोशी, महेंद्र ढोले, आर्जव जैन, मनोज पिदडी, मनिष नायडू, बाबा खिरवडकर अशा अनेकांचे हात या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता लाभले.