बालकलाकारांचा उत्‍साह शिगेला

0
 • बालकला अकादमीच्‍या ‘तारे जमीं पर’ कार्यक्रमाची तयारी जोरात
 • खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात 9 डिसेंबर रोजी प्रस्‍तुती
  नागपूर, 4 डिसेंबर 2022
  खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात बालकला अकादमी, नागपूरतर्फे येत्‍या, 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता ‘जारे जमीं पर’ हा बालकलाकारांच्‍या गायन, वादन, नृत्‍य व नाट्याने परिपूर्ण असा कार्यक्रम प्रस्‍तुत केला जाणार असून त्‍याच्‍या तयारीला आता वेग आला आहे. ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण संस्‍थेच्‍या मैदानात सकाळी 7 वाजेपासून बालकलाकारांचा सराव सुरू असून त्‍यांचा उत्‍साह शिगेला पोहोचला आहे.
  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून आकाराला आलेल्‍या खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात यंदा स्‍थानिक कलाकारांचा मोठा सहभाग असून बालकलाकाराही मोठ्या प्रमाणात आपली कला या भव्‍य मंचावर सादर करणार आहेत. बालकला अकादमीतर्फे स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवीवर्षानिमित्‍त ‘तारे जमीं पर’ हा वैविध्‍यपूर्ण कार्यक्रम सादर करण्‍यात येणार आहे.
  बालकला अकादमीचा मुख्य उद्देश मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा हा आहे. यादृष्टीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे, त्यासाठी मुलांना व्यासपीठ मिळवून देणे, वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे, यासाठी प्रयत्नशील असते. समूह गीत स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, शिक्षकांसाठी जोगवा, गोंधळ समूहगीत स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात येते. खासदार महोत्सवात मुलांचा सहभाग असावा यासाठी मधुरा गडकरी यांनी तारे जमीन पर या कार्यक्रमाची आखणी केली. त्‍याकरिता विविध शाळांतील पहिली ते दहावीच्‍या विद्यार्थ्‍यांची निवड चाचणी घेण्‍यात आली होती. त्‍यातून सुमारे 400 गायन, वादन, नृत्‍य व नाटक अशा विविध कलाप्रकारातील बालकलावंतांची निवड करण्‍यात आली होती. कार्यक्रमाची तारीख जवळ येत ही मुले सांस्‍कृतिक महोत्‍सवाच्‍या मंचावर सराव करण्‍यात गुंतलेली आहेत.
  ‘तारे जमीं पर’ या कार्यक्रमाची संहिता आशुतोष अडोणी यांची असून शिरीष भालेराव, गजानन रानडे, स्‍नेहल रानडे, संजय भाकरे, शेखर मंगलमूर्ती, रोशन नंदवंशी, स्वाती भालेराव, रवी सातफळे, कुणाल आनंदम, ऋतूजा गडकरी, रसिका बावडेकर यांच्‍या मार्गदर्शनात हे बालकलाकार गायन, वादन, नृत्‍य व अभिनयाचा सराव करीत आहेत.
  बालकलाकारांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी नागपूरकरांनी मोठ्या संख्‍येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन बालकला अकादमीचे मार्गदर्शक रवींद्र फडणवीस, अध्यक्ष मधुरा गडकरी, उपाध्यक्ष रश्मी फडणवीस, सचिव सुबोध आष्टीकर, सीमा फडणवीस, शुभदा फडणवीस यांनी केले आहे.
    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा