Home Artical Blog ‘जय परशुराम’च्या गजराने दुमदुमला परिसर…

‘जय परशुराम’च्या गजराने दुमदुमला परिसर…

0

भगवान परशुराम जयंतीनिमित्त भव्य स्कुटर रॅली उत्साहात संपन्न

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आयोजन

नागपूर (Nagpur), दि. १९ एप्रिल २०२६ :

भगवान श्री परशुराम जयंती आणि अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, नागपूर यांच्या वतीने आयोजित भव्य स्कुटर रॅली उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या जल्लोषात पार पडली. मध्य व दक्षिण मध्य नागपूर भागात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

रॅलीची सुरुवात आग्याराम देवी मंदिर येथे आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते भगवान परशुरामाच्या पूजनाने झाली. यावेळी नगरसेविका धनश्री देशपांडे, महासंघाचे अध्यक्ष पराग जोशी, सरचिटणीस जय पाठक, संयोजक तुषार पिदडी, सहसंयोजक श्रद्धा पाठक, तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भगवान परशुरामाची भव्य प्रतिमा आकर्षक रथावर विराजमान होती. वाढते तापमान आणि रस्त्यावरील गर्दी यांच्यावर मात करत मंगलवाद्यांच्या गजरात, टाळकरी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने रॅलीला धार्मिक व सांस्कृतिक रंग चढला. मार्गातील चौकाचौकात नागरिकांनी पुष्पवृष्टी करत रॅलीचे स्वागत केले. “जय परशुराम”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. तरुणाईपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

रॅलीने आग्याराम देवी मंदिर येथून प्रारंभ करून दत्त मंदिर, आसरा देवी मंदिर, श्री गणेश मंदिर, थाडेश्वरी राम मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चिटणीस पार्क चौक, रेशीमबाग परिसर अशा विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केले.
हनुमान नगर येथील त्रिकोणी मैदानात रॅलीचा समारोप झाला. यावेळी भाजप नागपूर महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, देवेन दस्तुरे, संजय चिंचोले, महासंघाचे राष्ट्रीय महासचिव आशुतोष गोटे, अध्यक्ष पराग जोशी, संयोजक तुषार पिदडी,तसेच नगरसेविका मंगला म्हस्के उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शंखनाद व परशुराम पूजनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते भगवान परशुरामाची आरती करण्यात आली व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

यावेळी दयाशंकर तिवारी यांनी रॅलीला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. ब्राह्मण समाजातील संस्कार, वेळेचे महत्त्व आणि समाजउन्नतीसाठी असलेली बांधिलकी यावर त्यांनी भाष्य केले. समाजातील एकजूट टिकवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

तुषार पिदडी यांनी प्रास्ताविकातून रॅली आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. पराग जोशी यांनी पहिल्याच वर्षी मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त करत, ही रॅली दरवर्षी अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह संयोजिका श्रद्धा पाठक यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात शैलेश मुठाळ, राहुल जोशी, अनुप उंबरकर, रेणुका बडगे, मयूर अयाचित, पल्लवी नाकाडे, अमित शिगरे, मोहन लेहगावकर, सुधीर सगोळे, प्रांजली मोहाने, अजय राजकारणे आदींचा सक्रिय सहभाग होता.

 

#Nagpur #ParshuramJayanti #AkshayaTritiya #ScooterRally #BrahmanMahasangh #JayParshuram #CulturalEvent #ReligiousCelebration #NagpurEvents #YouthParticipation #CommunityUnity #MaharashtraNews #IndianCulture #ShankhnaadNews