Home Breaking news अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे; SIT तपास वेगात

अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे; SIT तपास वेगात

0

नाशिक(Nashik): नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग आला असून न्यायालयाने आरोपी अशोक खरात याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या विशेष तपास पथक (SIT) त्याची कसून चौकशी करत आहे. दरम्यान, एसआयटीचे पथक पुन्हा एकदा नाशिकमधील ‘फोकस प्रॉपर्टी’ या त्याच्या कार्यालयात दाखल होऊन तपासणी केली. आजच्या कारवाईदरम्यान पोलिसांनी काही फिर्यादींनाही सोबत आणले होते. कार्यालय उघडून पुन्हा तपास करण्यात आला असून महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून संपूर्ण ठिकाणाची मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आली.

कार्यालयात काय आढळले?

तपासादरम्यान ज्या केबिनमध्ये महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे, त्या ठिकाणी छोटे स्पॉट लाईट (फोकस लाईट) बसवलेले असल्याचे आढळले. मागील भिंतीवर ‘ॐ’चे चिन्ह लावून आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच बाहेरील भागात तिरंगा लावण्यात आला होता, जिथे महिलांचे नातेवाईक बसत असत.

तपासात आरोपीचे अजब दावे:

चौकशीदरम्यान अशोक खरात स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. “माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, मी लोकांचे भले केले पण तेच माझ्यावर उलटले,” असा दावा त्याने केला. महिलांसोबत केलेल्या कृत्याला ‘विधीचा भाग’ असल्याचेही त्याने सांगितले असून कोणावरही जबरदस्ती केली नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. पुढे तो “आता मी फक्त माझ्या मेंदूचे ऐकेन,” असेही म्हणाल्याची माहिती आहे. पोलीस कोठडीत असतानाही तो मंत्रजप करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

व्यावसायिकांचीही फसवणूक:

या प्रकरणात केवळ महिलांचे शोषणच नव्हे, तर अनेक उद्योजक आणि व्यावसायिकांची आर्थिक फसवणूक केल्याचेही समोर आले आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद हे देखील त्याचे बळी ठरल्याचे समोर आले. ज्योतिष सल्ल्याच्या बहाण्याने खरातने त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले. महागडी कार, परदेश दौरे, फार्महाऊस बांधकाम आणि इतर खर्चही त्यांच्याकडून करून घेतल्याचा आरोप आहे.

शस्त्र परवान्याबाबत खुलासा:

तपासात आणखी एक महत्त्वाची बाब उघडकीस आली आहे. अशोक खरात याला 15 ऑक्टोबर 2012 रोजी शस्त्र परवाना देण्यात आला होता, तर 1 जानेवारी 2024 रोजी त्याचे नूतनीकरण झाले होते. त्याच्या फार्महाऊसवरून 21 काडतुसे जप्त करण्यात आली असून त्यापैकी 5 काडतुसे वापरलेली असल्याचे समोर आले आहे. या काडतुसांचा वापर नेमका कशासाठी झाला, याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, राज्यभर गाजत असलेल्या या प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून तपास यंत्रणा अधिक माहिती गोळा करण्यात व्यस्त आहेत.