नागपूरः राज्यातील विविध जिल्ह्यांमधील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीतील सदस्यांसह थेट सरपंच पदासाठीही रविवारी (Gram Panchyat Elections Results) मतदान पार पडले. यापैकी सर्वाधिक ग्रामपंचायती विदर्भातील होत्या. विदर्भात एकूण २२७६ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. ग्राम पंचायत निवडणुकीत आम्हीच विजयी ठरलो व आम्हीच नंबर-१ आहोत, असा दावा भाजप-शिंदे गट तसेच महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांकडून करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सर्वप्रथम प्रसार माध्यमांपुढे येत भाजपला ग्राम पंचायत निवडणुकीत मोठे यश मिळाल्याचा व भाजप पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा केला. ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये शिंदे व फडणवीस सरकारच्या कामाची छाप दिसून आली आहे. पहिल्या टप्प्यात आलेल्या १००० ग्रामपंचायतीच्या निकालापैकी ५१३ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. १४० ग्रामपंचायती शिंदेच्या शिवसेनेने राखल्या आहे. काँग्रेसची अवस्था अपक्षांपेक्षा वाईट झाली आहे.
संपूण्र निकाल येतील तेव्हा ३ हजार ग्रामपंचायती भाजपाच्या असतील तर १ हजार ग्रामपंचायती शिंदेच्या शिवसेनेच्या असतील, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तर सायंकाळी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटच्या माध्यमातून आकडे मांडले. भाजपने 2072, तर शिंदे गटाने 703 ग्राम पंचायतींमध्ये बाजी मारल्याचे सांगत भाजप नंबरवन ठरल्याचे उपाध्ये यांनी नमूद केले तर राष्ट्रवादी काँग्रेस 1121, काँग्रेस 689 आणि उद्धव ठाकरे गटाला 507 ग्राम पंचायतींमध्ये यश आल्याचा दावाही उपाध्ये यांनी केला.
काँग्रेसचाही दावा
दरम्यान, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ९०० पेक्षा जास्त ठिकाणी विजय मिळवला असून महाविकास आघाडीच राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दावे खोटारडे आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यातही भाजपाचा दारूण पराभव झाला असून गावखेड्यातील लोकांनी भारतीय जनता पक्ष व शिंदे गटाला सपशेल नाकारले आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेस व मित्र पक्षाने दमदार कामगिरी केली असून गावातील लोकांनीही काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त करत विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपा व शिंदे गटाची गावात इज्जत राहिली नाही, लोकांमध्ये इज्जत राहिली नाही. महाविकास आघाडीच्या विजयाची धास्ती घेऊन भाजवा व शिंदे गट विधानभवनच्या पायऱ्यांवर आंदोलनाचा थयथाट करत आहेत. ग्रामीण भागात काँग्रेसची पाळेमुळे आजही घट्ट आहेत, जनतेने काँग्रेस पक्षावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू. नागपूर जिल्ह्यात २३६ पैकी २०० ग्रामपंचायतींवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असून भाजपला ३६ जागाही मिळाल्या नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावातही काँग्रेसचा विजय झाला आहे. भाजपा विजयाचे खोटे दावे असून दुस-याच्या घरी पोरगा झालातरी भाजपवाले लाडू वाटतात. विधानपरिषद निवडणुकापांसून भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची मालिका सुरू झाली असून नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आता ग्रामपंचायतमध्येही पराभव केला आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही भाजपाला धूळ चारून काँग्रेसच्या विजयाचा गुलाल उधळू, असेही पटोले म्हणाले.