चंद्रपूरच्या मलनिःसारण वाहिनीच्या कामाची चौकशी

0

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती ः गोंधळातच तारांकित प्रश्नोत्तरे


नागपूर. चंद्रपूर महापालिकेतर्फे शहरांतर्गत मलनिःसरण वाहिनी व एसटीपीच्या कामांची म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जात आहे. त्यांच्या अहवालानंतर गरज पडल्यास संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टेड केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
विरोधकांच्या गोंधळातच प्रश्नोतराचा तास पुकारला गेला. आमदार विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या मलनिःसारण वाहिनी व 24 एमएलडी क्षमतेच्या एसटीपीच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत संबंधित कर्मचाऱ्यांना ब्लॅक लिस्टेड करणार का, असा प्रश्न उपस्थत केला. देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की, कामांबाबत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेच्या तक्रारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाच्या अनुषंगाने चौकशी व तपासण्या करून घेण्यास सांगण्यात आले होते. तपासणीवेळी पाऊस येत असल्याने तांत्रिक अडचणी आल्या होत्या. यामुळे नव्याने तपासणीचे निर्देश देण्यात आले आहेत. तपासणी व चौकशी अहवालातील शिफारशीनुसार कारवाई केली जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले. आमदार किशोर जोरगेवार यांनी कामात दोष दिसत असल्याचे सांगून प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती फडणवीस यांना केली. त्यावर फडणवीस यांनी गुणवत्तेकडे लक्ष दिले जाईल. थोडे काम बाकी आहे. संपूर्ण काम गुणवत्तापूर्ण झाल्याची खात्री करून घेतली जाईल. गरज पडल्यास कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टेडही करणार. चंद्रपूरला येणे होईल, त्यावेळी निश्चितच कामाची प्रत्यक्ष पाहणीसुद्धा करणार आसल्याचे फडणवीस यांनी सांगिले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा