
• ‘ग्रीन हायड्रोजन आणि स्वच्छ ऊर्जा’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
(Nagpur)नागपूर : पूर्वीचे शतक आर्थिक निर्णय घेण्याचे होते. आज जगाला ग्लोबल वॉर्मिंगसारख्या संकटांचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे आता हरित निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे सीएसआयआर-नीरी, नागपूरचे संचालक डॉ. अतुल वैद्य यांनी सांगितले.
इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया) व आयईईई (नागपूर उपविभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रीन हायड्रोजन अँड क्लिन एनर्जी’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा आज रविवारी समारोप झाला. इंस्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स, नॉर्थ अंबाझरी रोड, नागपूर येथे झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नागपूरचे संचालक डॉ. भीमर्या मेत्री यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.वैद्य पुढे म्हणाले की, हायड्रोजनसारखे हरित ऊर्जेचे पर्याय ज्या प्रकारे महत्त्वाचे आहेत, त्याचप्रमाणे त्याचे स्रोत, उत्पादन प्रक्रिया आणि उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेचा प्रकार पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर संपूर्ण प्रक्रिया हरित असेल तरच त्याला हरित आणि स्वच्छ ऊर्जा म्हणता येईल. ऊर्जा निर्मितीच्या प्रक्रियेबाबत जागरूक राहण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यांनी प्रत्येक टप्प्यावर ऊर्जा उत्पादनाचे विश्लेषण करण्यास सांगितले. जर हायड्रोजनचा स्त्रोत पाणी असेल आणि त्यातून हायड्रोजन तयार करण्यासाठी सौर उर्जा इलेक्ट्रोलिसिस चावापर होत असेल तर त्याला स्वच्छ आणि हरित म्हटले जाईल असे त्यांनी विषयाला खोलवर समजावताना सांगितले.
प्रारंभी, इंस्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स चे अध्यक्ष सतीश रायपुरे यांनी प्रास्ताविक केले. हे आंतरराष्ट्रीय संमेलन यशस्वी करण्यासाठी त्यांनी संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. इंस्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स चे माजी अध्यक्ष कुलकर्णी यांनीही दोन दिवसीय परिषदेतले अनुभव सांगितले. दोन दिवस चाललेल्या बौद्धिक सत्राबद्दल आणि चर्चेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले
संयोजक एस.एफ. लांजेवार यांनी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी अधिवेशनाचा तपशील सांगितला. परिषदेत 350 प्रतिनिधी, 8 तज्ञ सत्रे, 72 पेपर सादरीकरण झाले आणि अनेक प्रमुख वक्ते यांचा सहभाग होता. या परिषदेत जगभरातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांनी प्रतिनिधी आणि सहभागी कंपन्या आणि महाविद्यालयांचे आभार मानले.
(Dr. Shilpa Kalambe)डॉ.शिल्पा कळंबे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तिने सांगितले की 20 हून अधिक प्रकल्प सादर केले गेले आणि संपूर्ण भारतातील 300 हून अधिक सहभागींनी प्रकल्प आणि पोस्टर स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला.
सतीश रायपुरे,डॉ महेश शुक्ल आणि एस.एफ. लांजेवार, अरुण घुशे, प्रदीप माटे, अरविंद झाडे, अनिल इंदाने, रुही उझमा यांनी हे संमेलन यशस्वी करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.
ग्रीन हायड्रोजन गेम चेंजर ठरेल: डॉ. भीमराया मेत्री (Dr. Bhimraya Metri)
भारत सौर ऊर्जा क्षेत्रात अनेक सुधारणा करत आहे. पुढील वर्षापर्यंत आयआयएमचे नागपूर कॅम्पसही सौरऊर्जेवर आधारित असेल, असे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी सांगितले. ग्रीन हायड्रोजन हे ऊर्जा क्षेत्रासाठी नवीन तंत्रज्ञान असून संभाव्य गेम चेंजर आहे. अनेक संस्था हायड्रोजनचा प्रभावीपणे वापर करण्याचे आणि साठवण्याचे मार्ग शोधत आहेत. हरित आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापरात नागपूरला रोल मॉडेल बनवण्यासाठी नागपूरचे विद्यार्थी हरित ऊर्जा प्रकल्पांमध्ये रस घेतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.