सुशीलकुमार शिंदेंना ‘ऑफर’.. काय म्हणाले बावनकुळे?

0

(Solapur)सोलापूर : दोनदा पराभव होऊन भाजपने आपल्याला ऑफर दिली होती, असा दावा ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी केलाय. भाजपने हा दावा फेटाळून लावला आहे. शिंदे यांना भाजपकडून कुठलीही ऑफर देण्यात आली नाही, असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचा दावा फेटाळून लावला.

अक्कलकोट तालुक्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शिंदे यांनी मला आणि प्रणिती यांना ऑफर दिली होती, असा दावा केला होता. त्याची आज दिवसभर चर्चा सुरु असतानाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदेंचा हा दावा फेटाळला. बावनकुळे म्हणाले की, मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे की भाजपने सुशीलकुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदे यांना ऑफर दिली नाही. भेटी होणे ही वेगळी गोष्ट आहे. मात्र, पक्ष म्हणून आम्ही कुठलीही ऑफर दिली नाही. आमच्या पक्षाला तशी गरज नाही. पण कुणीही जर आमचा दुपट्टा घालायला तयार असेल तर आम्ही तयार आहे. मोदींचे नेतृत्व स्वीकारायला कुणी येत असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करणार, असे ते म्हणाले.
नाव सांगणार नाही

दरम्यान, भाजपच्या कोणत्या नेत्याने ऑफर दिली असा प्रश्न आज प्रसार माध्यमांनी शिंदे यांना विचारला असता कोणी ऑफर दिली हे सांगायचे असते का? ते सांगायचे नसते, असे शिंदे म्हणाले. मला ज्यांच्याकडून ऑफर आली ते भाजपचे खूप मोठे नेते आहेत. पण, मी त्याच्याबाबत काहीही उघड करणार नाही. स्पष्टपणे सांगतो की मी काँग्रेसवाला आहे आणि काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही, असेही ते म्हणाले.