चंद्रपुरात साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी दिली नीट परीक्षा

0

परीक्षेदरम्यान 100 मीटर परिसरात निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

चंद्रपूर (chandrapur), ५ मे – देशभरातील वैद्यकीय शाखेच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट (NEET-UG) परीक्षा आज चंद्रपूर जिल्ह्यात शांततेत पार पडत आहे. जिल्ह्यातील ९ परीक्षा केंद्रांवर एकूण ३६१९ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी आणि कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

या आदेशानुसार, परीक्षार्थी वगळता इतर कोणत्याही दोन किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय, नियमित वाहतुकीखेरीज कोणत्याही हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे. परीक्षेच्या पारदर्शकतेस बाधा पोहोचू नये म्हणून झेरॉक्स, फॅक्स, मोबाईल, इंटरनेट आणि इतर कोणत्याही कम्युनिकेशन सुविधांवरही बंदी लागू करण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, आणि शिक्षण विभाग यांच्यात समन्वय साधून सर्व परीक्षा केंद्रांवर योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ठिकाणी वेळेत पोहोचता यावे आणि गर्दी होऊ नये, यासाठी पालक व स्थानिक नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच, केंद्रांवर विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची, टॉयलेट्सची व आपत्कालीन वैद्यकीय सेवा यांसारख्या सुविधा सुनिश्चित करण्यात आल्या आहेत.

प्रशासनाच्या सजगतेमुळे व नियोजनबद्ध तयारीमुळे सर्व परीक्षा केंद्रांवर शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात परीक्षा सुरू आहे.