

उद्योग व व्यवस्थापन क्षेत्रातील विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
नागपूर(Nagpur): विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशन आणि ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन संलग्न “सिनर्जी १.० – व्यवस्थापन परिषद” नुकतीच रायसोनी एज्युकेशन, रियान टॉवर, सदर येथे पार पडली. मायक्रो फिल्टर प्रस्तुत या परिषदेला उद्योजक, व्यावसायिक, व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्यार्थी व युवा उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
परिषदेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यवस्थापन, संवादकौशल्य, विक्री, ब्रँडिंग आणि प्रकल्प व्यवस्थापन आदी विषयांवर मार्गदर्शन केले. गोडबोले गेट्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत गोडबोले यांनी “वाटाघाटींमध्ये समतोल कसा राखावा” या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. आशुतोष पातुरकर यांनी “इतर व्यवसायांमधील चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचे फायदे” या विषयावर विचार मांडले.
सचिन जहागिरदार यांनी “इतिहासातून व्यवस्थापनाचे धडे”, तर डॉ. शब्बीर जकेरिया यांनी “कार्यस्थळी संवाद कौशल्य” या विषयांवर मार्गदर्शन केले. महेंद्र गिरीधर यांनी “विक्रीतील ताणतणाव व्यवस्थापन” आणि मुकुंद मोहता यांनी “अॅस्यूम” या विषयावर विचार मांडले.
सचिन येटे यांनी “नव्या व्यवसाय पद्धतींमधील संधी”, मंगेश जोशी यांनी “प्रकल्प व्यवस्थापनातील खर्च नियंत्रण”, ब्रिज सरडा यांनी “ग्राहकांच्या ब्रँडविषयक मानसिकतेचा अभ्यास” आणि अनिरुद्ध हजरा यांनी “संयुक्त व्यवसाय क्षेत्रात प्रवेश कसा करावा” या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व्हीएमएच्या अध्यक्षा मिली जुनेजा, सचिव हेमंत झुंजुरकर, प्रकल्प संचालक तरुण कटियार, समन्वयक रोहित दुजारी तसेच खजिनदार सुमित प्रिथ्यानी यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.


















