
एकनाथ शिंदे दरे गावी, बावनकुळे, महाजनांकडून मनधरणी
मुंबई (Mumbai) : नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सत्ताधारी महायुतीमध्ये असंतोष उफाळून आला आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार गटातील आदिती तटकरे यांच्याकडे गेल्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी विरोध दर्शविला आहे. यावरून निर्माण झालेल्या वादात माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे नाराज होत सातारा येथील दरे या आपल्या मूळगावी निघून गेले आहेत. त्यामुळे महायुती सरकारमधील नाराजी नाट्य समोर आले आहे.
महायुतीमध्ये नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून वाद निर्माण झाला आहे. रायगडचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आदिती तटकरे यांना तर नाशिकचे पालकमंत्रिपद भाजप नेते गिरीश महाजन यांना देण्यात आले आहे. मात्र,आदिती तटकरे यांच्या नावाला शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचा विरोध आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावर मंत्री भरत गोगावले यांचाही दावा होता. मात्र, आदिती तटकरे यांचे नाव जाहीर होताच गोगावले यांच्यासह शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील टोकाचा विरोध दर्शविला आहे.
तिकडे नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची वर्णी लागल्यानंतर शिवसेना नेते दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी दर्शवली होती. या दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाच्या वादामुळे महायुतीमधील मतभेद उफाळून आले. त्यानंतर राज्य सरकारने एका शासन निर्णयाद्वारे रायगड व नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती दिली. त्यामुळे नाराज झालेले एकनाथ शिंदे अचानक मुंबई सोडून आपल्या दरे या मूळगावी निघून गेले. शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हेलिकॉप्टरने दरेगावला रवाना झाले. भाजपच्या या दोन नेत्यांनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यातून महायुतीमधील वाद संपुष्टात येईल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.