राष्ट्रपती राजवटीची कल्पना शरद पवारांचीच

0

मुंबई MUMBAI – २०१९ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवटीची  President’s rule कल्पना शरद पवार यांचीच होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी केला आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना फडणवीस यांनी २०१९ मधील सत्तानाट्यावर आणखी खुलासा केला. २०१९ मध्ये शिवसेनेने विश्वासघात करून काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणी सुरू केल्यावर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आम्हाला त्रिपक्षीय सरकार नको असल्याने आम्ही भाजपसोबत येऊ शकतो, असा प्रस्ताव दिला होता, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांनी सांगितले की, आम्ही भाजपसोबत येणार असल्याचे शरद पवार यांनीच सांगितले. याची जबाबदारी माझ्यावर आणि अजित पवारांवर टाकण्यात आली. आम्ही पोर्टफोलिओ, जिल्हे याबाबत निर्णय घेतला, त्या प्रक्रियेत राष्ट्रपती राजवट लावण्याचे ठरले आणि त्यानंतर शरद पवारांनी आपला निर्णय बदलला. हे योग्य नाही, असे अजित पवारांना वाटले. त्यामुळेच आम्ही भाजपसोबत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. २०१९ मध्ये झालेला हा करार अजित पवारांशी नसून शरद पवार यांच्याशी झाला होता, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांच्यासोबत हा निर्णय झाला. अजित पवार यांनी अधिकृत केल्यानंतरच आम्ही त्यांच्यासोबत बसलो. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कल्पना शरद पवार यांची होती. मी इतक्या लवकर यू-टर्न घेऊ शकत नाही, असे शरद पवार म्हणाले. तुम्ही राष्ट्रपती राजवट लावा. त्यानंतर मी महाराष्ट्राचा दौरा करेन आणि त्यानंतर महाराष्ट्राला स्थिर सरकार हवे, त्यामुळे आम्ही भाजपसोबत जात आहोत, अशी भूमिका मी घेणार आहे.

दरम्यान, महायुतीमध्ये अजित पवारांच्या समावेशावरही फडणवीस यांनी भाष्य केले. अजित पवारांच्या आगमनाने आमच्या जबाबदाऱ्या विभागल्या गेल्या आहेत. राजकारणात नेहमीच जी शक्ती असते, ती अधिक संघटित करावी लागते. ती वाढवावी लागते. आज इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधी पक्ष एकत्र येत आहेत, अशा वेळी भाजप इतर पक्षांनाही सोबत घेईल. अजित पवार आले त्यामुळे आमची ताकद वाढते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

अजित पवार खरेच आजारी होते का, याबद्दल विचारले असता फडणवीस यांनी सांगितले की, सध्याची परिस्थिती अशी आहे की आजारी पडलो तरी बातम्या होतात. मी त्यांच्याशी बोललो तर त्यांचा आवाजही येत नव्हता. आमचे दिल्लीला जाणे आधीच ठरले होते, असेही ते म्हणाले.