आदिवासी तरुणांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण द्या

0
आदिवासी तरुणांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण द्या
provide-international-standard-training-to-tribal-youth

केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी;आदिवासी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

नागपूर (Nagpur) :- आदिवासी समाजातील तरुण-तरुणींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील कौशल्य विकसित करा. त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था उभी करा. आदिवासी मुली एअर हॉस्टेस झाल्या पाहिजे. त्यांच्यातून पायलट, दर्जेदार शेफ घडले पाहिजे. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्या, अशा सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आदिवासी विकास विभागाला दिल्या.

आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. पोलीस लाईन टाकळी येथील पोलीस मुख्यालय ग्राऊंडवर या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. उद्घाटन सोहळ्याला आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके, माजी महापौर माया इवनाते, माजी आमदार टेकचंद सावरकर, आदिवासी विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, कृष्णराव परतेकी आदींची प्रमुख उपस्थिती होती. शासकीय अनुदानित आश्रमशाळांचे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाल्याचा आनंद ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केला.

ना. श्री. गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले, ‘उत्तम कर्तृत्व आणि नेतृत्व घडवायचे असेल तर मुला-मुलींचा खेळांमध्ये सहभाग आवश्यक आहे. आदिवासी मुलांमध्येही उत्तम संशोधक, नागरिक, शिक्षक, खेळाडू लपलेला आहे, हे त्यांनी सिद्ध केले आहे. आदिवासी मुला-मुलींमध्ये खूप क्षमता आहे. त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. ज्ञानातून शैक्षणिक विकास शक्य आहे. हे ज्ञान देण्याची जबाबदारी देखील आदिवासी विकास विभागाची आहे.’

कौशल्य विकास केंद्र सुरू करा

आदिवासी समाजातून संशोधक, डॉक्टर, आयएएस तयार व्हावे, यासाठी प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी आश्रमशाळांचे रेटिंग करा. ज्या आश्रमशाळा चांगले काम करत असेल त्यांना कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यासाठी मदत करा, अशा सूचनाही ना. श्री. गडकरी यांनी आदिवासी विकास विभागाला केल्या.

स्व. लक्ष्मणराव ट्रस्टचे आदिवासींसाठी कार्य

गेल्या २५ वर्षांपासून विदर्भातील आदिवासी भागांमध्ये स्व. लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या वतीने १६०० आश्रमशाळा चालवल्या जातात. या शाळांमध्ये १८०० शिक्षक आहेत. त्यातील ९० टक्के शिक्षक आदिवासी आहेत. कुठलेही सरकारी अनुदान न घेता हे कार्य सुरू आहे. या शाळांमधील ६५ मुली उत्तम खेळाडू आहेत. माझे मित्र रविंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपुरातील महिला महाविद्यालयात या मुलींसाठी वसतीगृह निर्माण केले. त्यानंतर या मुलींनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळांमध्ये स्वतःला सिद्ध केले, याचाही ना. श्री. गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला.