पंजाबच्या राज्यपालांचा राजीनामा, जाणून घ्या काय आहे कारण?

0

पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी आज, शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी पद सोडण्यामागची वैयक्तिक कारणे दिली आहेत. तत्पूर्वी पुरोहित शुक्रवारी (2 फेब्रुवारी) दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

बनवारीलाल पुरोहित यांनी ऑगस्ट 2021 मध्ये पंजाबचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यापूर्वी पुरोहित 2017 ते 2021 या काळात तामिळनाडूचे राज्यपाल होते. तर 2016 ते 2017 पर्यंत आसामचे राज्यपाल म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. भाजप नेते असलेले बनवारीलाल पुरोहित यांचा जन्म 16 एप्रिल 1940 रोजी राजस्थानमध्ये झाला होता. राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते 3 वेळा नागपूरचे खासदार होते. पंजाबमधील त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त होता. विशेषत: भगवंत मान यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या संबंधात कमालीचा तणाव निर्माण झाला होता. पंजाब विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यावरून दोघांमधील वाद इतका वाढला की हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. विविध प्रश्नांवर राज्यपाल सातत्याने पंजाब सरकारकडे जाब विचारत असत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी पंजाब विधानसभेच्या 2 दिवसीय अधिवेशनात मांडण्यात येणारी 3 विधेयके मंजूर करण्यास नकार दिला होता. यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह आम आदमी पक्षाने त्यांना विरोध केला.

विशेष म्हणजे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी राज्यपालांवर टीकास्त्र सोडले होते. पंजाबमधील राज्यपाल आपल्याला त्रास देत असल्याचे मान दिल्लीत म्हणाले होते. हे कायदेशीर नसून बेकायदेशीर असल्याचे राज्यपाल वेळोवेळी सांगतात. लोकशाहीत निवडून आलेली सत्ता असते. बर्याच लोकांना निवडलेल्या नियमाची सवय विकसित केल्याचा टोला मान यांनी लगावला होता.