जिल्हाध्यक्षांनीच केली मागणी
नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघ महायुतीत कोण लढविणार, यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. शिंदे गटाकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी दावा केला असला तरी भाजपचे मत वेगळे आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ‘कमळ’ चिन्हावर लढली जावी, अशी मागणी भाजपच्या नागपूर ग्रामीण जिल्ह्याध्यक्षांनीच केली आहे.
नागपूर ग्रामीणमधील रामटेक लोकसभा मतदारसंघावर गेली दोन टर्म शिवसेनेचे वर्चस्व राहिलं आहे. त्याआधीही २००९ ते २०१४ चा अपवाद वगळता १९९९ पासून सलग दहा वर्ष शिवसेनेचाच खासदार होता. आता भाजपचा या जागेवर दावा केलाय. रामटेकमधील उमेदवाराने कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवावी, रामटेकची जागा भाजपला मिळावी ही आपली मागणी असल्याचे नागपूर ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे म्हणाले. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप यांच्यात रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोहळे म्हणाले की, नागपूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात मी फिरतोय. प्रत्येक भाजप कार्यकर्त्याची ही मागणी आहे. रामटेक लोकसभेचा उमेदवार हा कमळ चिन्हावर लढला पाहिजे, हा उमेदवार आमचा असला पाहिजे. त्यामुळे रामटेकची जागा भाजपला मिळावी, ही आम्हा भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे, असेही ते म्हणाले.