‘मुर्खांच्‍या बाजारात’ रंगली हास्‍यपंचमी

0

नागपूर (Nagpur), 22 मार्च
होळी व रंगपंचमीच्‍या निमित्‍ताने विष्‍णुजी की रसोई येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या ‘मुर्खांचा बाजार’ मध्‍ये हास्‍य व व्‍यंग कवितांच्‍या माध्‍यमातून हास्‍यपंचमी साजरी करण्‍यात आली. कविंनी विविध विनोदी कविता सादर करून रसिकांना हास्‍यरंगात न्‍हाऊ घातले.

शुक्रवारी सायंकाळी विष्णुजी की रसोई येथे पार पडलेल्‍या या कार्यक्रमाची संकल्‍पना विष्‍णू मनोहर यांची होती तर निर्मिती प्रवीण मनोहर यांची होती. उपस्थित सर्व हास्यकवींचे स्वागत प्रफुल मनोहर आणि वसुंधरा यांनी अतिशय अनोख्या पद्धतीने गाठी आणि गुळ देऊन तसेच, गुलाल लावून केले. सुप्रसिद्ध हास्य कलाकार राजेश चिटणीस व नेहा ठोंबरे या कार्यक्रमाचे मुख्‍य आकषर्ण होते. विष्णू मनोहर यांनी राजेश चिटणीस यांची गमतीशीर मुलाखत घेतली. दरम्‍यान, ‘होळीच्या वक्ती मले सार्‍यायनच रंग लावला’ ही गमतीदार वर्‍हाडी कविता व दिगंबर वसंतराव डोईफोडे ही विनोदी भूमिका सादर सादर करून उपस्‍थ‍ितांचे मनोरंजन केले. नेहा ठोंबरे यांनी ‘तुटकी फुटकी इंग्रजी घेऊन आम्ही गेलो मुंबईले’ ही कविता सादर केली.

मिलिंद देशपांडे (Milind Deshapande)यांनी ‘आपली माती, आपली माणसं’ ही मराठी मनाला जागे करणारी कविता सादर केली तर
अनिल मालोकर यांनी ‘सावन का महिना था’ आणि ‘शेरनीसी खूंखार पत्नी’ या कविता सादर करून उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळवली. अनुराधा हवालदार यांनी ‘अनंताचं प्री लगीन’ ही अंबानीपुत्राच्‍या विवाहावर आधारित वर्‍हाडी भाषेतील कविता सादर केली. अभय पांडे वशिष्ट यांनी ‘मुझकों बढती उम्र ने बना दिया काकाजी’ ही कविता सादर करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. शीतल सोनावणे यांनी ‘डायटिंग नाय तर फायटिंग’ ही तर राजेश माहोरकार यांनी ‘फेयर अ‍ॅण्ड लव्हली’ ही हास्य कविता सादर केली. धनश्री पाटील यांनी ‘अशी कशी होळी बाबा’ ही वर्‍हाडी बाजाची कविता सादर करीत रसिकांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमाचे सूत्रधार विजय जथे यांनी ‘मोबाईल महान, जीव ठेवला गहान’ ही हास्य कविता सादर करीत रसिकांची दाद घेतली.