
मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असून, काही भागांत एलपीजी गॅसची कमतरता जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात तसेच देशभरात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, लॉकडाऊन लावण्याची कोणतीही गरज किंवा परिस्थिती सध्या निर्माण झालेली नाही.
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, त्याचा परिणाम गॅस वितरणावरही दिसून येत आहे. काही ठिकाणी एलपीजी तुटवडा जाणवत असताना सोशल मीडियावर विविध मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये देशभर लॉकडाऊन लागू होणार असल्याचे दावे केले जात आहेत. या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊन अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर गर्दी वाढल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारनेही लॉकडाऊनसंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. सोशल मीडियावर खोटी माहिती पोस्ट करणे किंवा अशा संदेशांचे प्रसारण करणे हा गुन्हा ठरू शकतो, असा इशारा त्यांनी दिला. अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शेजारील काही देशांमध्ये इंधन टंचाईमुळे अंशतः शटडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली असली तरी भारतात पुरवठा व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे. राज्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलचा सुमारे एक महिन्याचा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून अतिरिक्त इंधन साठवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा 20 टक्क्यांवरून 40 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे, ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. येत्या काळात गॅस आणि इंधन पुरवठा अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.















