समृद्धी महामार्ग : 4 महिने 3 अपघात 54 ठार !

0

समृद्धी महामार्गावरील प्रवास ठरतोय जीवघेणा samruddhi mahamarg accident

छ. संभाजीनगर, 15 ऑक्टोबर : झटपट, सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी बनवण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर गेल्या 4 महिन्यात 3 मोठे अपघात घडले असून यात 54 लोकांचा जीव गेलाय. सर्वाधिक अपघात हे रात्रीच्या वेळी घडले आहेत. त्यामुळे हा महामार्ग आहे की, यमपुरीचा रस्ता अशी चर्चा नागरिकांमध्ये होऊ लागली आहे.

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून आतापर्यंत शेकडो अपघात होऊन अनेक कुटुंबांची वाताहत झाली आहे. दररोज होणाऱ्या छोट्या-मोठ्या दुर्घटनांसोबतच मोठे अपघात घडले आहेत. जुलै ते ऑक्टोबर 2023 या काळात या मार्गावर 3 मोठे अपघात घडले असून त्यात 54 जणांचा बळी गेलाय. त्यामुळे आता या रस्त्याने प्रवास करायचा की नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. समृद्धी महामार्गावर 1 जुलै 2023 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ येथे विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. मद्यधुंद ड्रायव्हरच्या चुकीमुळे मध्यरात्री दीड बस मध्यभागाच्या भिंतीवर आदळली होती आणि बसला आग लागून अपघात घडला होता. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सरलांबे इथे 1 ऑगस्ट रोजी समृद्धी महामार्गाच्या पुलाचे काम सुरु इसताना गर्डर मशिन कोसळून 17 कामगारांचा मृत्यू झाला होता. ही दुर्घटना देखील मध्यरात्रीच घडली होती. त्यानंतर आज, रविवारी 15 ऑक्टोबर रोजी बुलढाण्याहून नाशिकला जाणाऱ्या ट्रॅव्हलरला वैजापूरजवळ जांबरगाव टोलनाक्यावर झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू तर 35 जण जखमी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील 35 भाविक बाबा सैलाणीच्या दर्शनासाठी गेले होते. ते तेथून परतत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झालाय.

या महामार्गावर गेल्या 6 महिन्यात सुमारे एक हजाराच्यावर अपघात घडले आहेत. तर यामधील गंभीर अपघातामध्ये आतापर्यंत 368 जणांनी आपला जीव गमावला आहे. चालकला झोप येणे किंवा डुलकी लागणे यामुळे 183 अपघात झालेत. तर टायर फुटल्यामुळे 51 अपघात घडले आहेत. तसेच वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे या महामार्गावर आतापर्यंत 200 अपघात झाले असून त्यामध्ये जवळपास 41 जणांचा बळी गेला आहे