देशात विश्वगुरु होण्याची निश्चित क्षमता-सरसंघचालक

0

नागपूर NAGPUR – ७५व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल परिसरातील मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत Sarsangchalak Dr. Mohan Bhagwat  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आपण बंधूभाव जोपासला तर देशाची प्रगती निश्चित असल्याचे प्रतिपादन भागवत यांनी यावेळी केले. भारतामध्ये विश्वगुरु होण्याची निश्चित क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले.

आपले आचरण संविधानाला अनुरूप असले पाहिजे, असे आवाहन करताना सरसंघचालक म्हणाले की, स्वातंत्र्य येण्यासाठी समतेचा संकोच होतो. पण यासाठी बंधुभाव आवश्यक आहे. ही व्यवस्था आम्ही तयार केल्याची भावना लोकांमध्ये आली पाहिजे. आत्मियतेचा भाव आपसांत बंधुभावाच्या रुपाने प्रकट होतो. हा बंधुभाव आपण जपला पाहिजे. भारतीयांची ताकद अतिशय मोठी आहे. ती कधीही कमी झाली नव्हती, ती तशीच कायम आहे. पण भारतीयांची ही ताकद जागृत होते, तेव्हा जगात चमत्कार घडतो. जे आज होत आहे, असे डॉ. भागवत म्हणाले.

आज आपला देश जसा आहे, त्याची कल्पना आपण ४० वर्षांपूर्वी केली असती तर आपली खिल्ली उडविली गेली असती. प्रत्येक क्षेत्रात आपण पुढे जात आहोत. ही शक्ती कुठून आली? ही शक्ती आपल्यात कायम होती. बंधुभावाच्या सामुहिक भावनेत गुंतलेलो असतो, तेव्हा ती परिणामकारक ठरते. हे केवळ माझ्यासाठी नाही तर सर्वांसाठी आहे. कारण सर्वजण माझे आहेत. आपण दिसायला वेगवेगळे असलो तरी या देशाची परंपरा विविधतेचा स्वीकार करणारी आहे. आपण विविधतेला फुटीरतावाद मानत नाही, असेही ते म्हणाले.
राज्यघटनेचे रक्षण करण्याची ‘तांत्रिक’ जबाबदारी सरकारची असली तरी त्यात नागरिकांची भूमिका अधिक महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले. रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातही यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.