वाघाच्या हल्ल्यात सुरक्षा रक्षक ठार लोहरा जंगलातील घटना

0

चंद्रपूर.(CHANDRAPUR)ताडोबातील वाघांची सख्या चांगलीच वाढली आहे. त्यातून वाघांकडून मानव व पाळीव प्राण्यांवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांमध्ये देखील चांगलीच वाढ झाली आहे. यामुळेच ताडोबा प्रकल्पातील वाघ इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. एकीकडे वाघांनी स्थानांतरित करण्याचे प्रयत्न आणि त्याचवेळी वाघांच्या हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (Tadoba Andhari Tiger Reserve ) बफर झोन अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर – मुल मार्गावरील (Chandrapur – Mul Road ) लोहराच्या जंगलात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात सुरक्षा रक्षक ठार झाला (security guard was killed in a tiger attack). ही घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता उघडकीस आली. त्यानंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघांना कुणाचाही विरोध नाही. पण, वन्यप्राणी- मानव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

पुरुषोत्तम बोपचे (४०) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. इंदिरा नगर येथील रहिवासी असलेला पुरुषोत्तम स्थानिक एम ई एल पोलाद कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. सकाळी पुरुषोत्तम वन फुले वेचण्यासाठी लोहारा जंगलात गेला होता. बराच वेळ होऊनही तो घरी परत आला नाही. यामुळे पत्नीने घरा शेजारी असलेल्या पतीच्या मित्रासोबत शोध घेतला. शोध घेत ते जंगलात पोहोचले असता तो मृतावस्थेत दिसला. शरिरावरील जखमांवरून वाघाने हल्ला करीत त्याची शिकार केल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती वाऱ्याच्या वेगाने गावात पसरली. वन विभागासह पोलिसांनाही सूचना दिली गेली. दोन्ही विभागांचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थली दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविला.

व्हायरल होणाऱ्या व्हीडिओने वाढविली चिंता

पट्टेदार वाघ डरकाळी फोडत पर्यटकांच्या जिप्सीच्या दिशेने धावत असल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होतो आहे. हा व्हीडिओ ताडोबातील असल्याचा दावा केला जात आहे. आक्रमकरित्या डरकाळी फोडणारा वाघ जिप्सीच्या दिशेने धावत असल्याचे बघून पर्यटकांची चांगलीच घाबरगुंडी उडते. वाघाला बघून घाबरलेले पर्यटक चालकाला जिप्सी मागे घेण्यास सांगतात. जिप्सी चालक कसाबसा जिस्पी मागे घेतो तरीही वाघाची डरकाळी सुरूच असते. वाघाचा अक्राळविक्राळ चेहरा पाहून जिप्सीतील सारेच पर्यटक चांगलेच घाबरतात, असे चित्र व्हिडीओत आहे. पण, तो ताडोबातील नसल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

पनीर भुर्जी करी आणि आटा व्हेज टिकीया | Paneer Bhurji Curry Recipe |Atta Veg Tikkiya Recipe |Ep- 117