भंडाराजवळ भीषण अपघात : राष्ट्रीय महामार्ग १८ तासापासून जाम
भंडारा. मुंबई – (BHANDARA)कोलकाता राष्ट्रीय माहामार्गावर (Mumbai – Kolkata National Highway ) भंडारा (Bhandara)पासून ६ किलोमीटर अंतरावर डिझेलचा टँकर आणि कंटेनरची जोरदार धडक (Diesel tanker and container accident) झाली. यानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. गुरुवारी रात्री ही घटना घडली. ऐन पुलावर झालेल्या या अपघातामुळे दोन्ही बाजुंची वाहतूक ठप्प झाली होती. रात्री उशिरा आग विझविल्यानंतर मार्ग मोकळा करण्यात आला. मात्र दुतर्फा अडलेल्या वाहनांच्या मोठ्या प्रमाणावरील संख्येमुळे रात्रीपासून वाहतुकीची समस्या कायमच आहे. या भीषण घटनेच्या १८ तासांनंतर देखील वाहतूक विस्कळीतच आहे. दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा असून वाहनचालकांना चांगल्याच गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अनेक वाहने तासन् तास अडकून पडली आहेत. भंडारा – नागपूर आणि भंडारा – लाखनी दरम्यान दोन्ही बाजुंनी वाहतूक कोंडीची समस्या जाणवते आहे. उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना सर्वाधिक फटका बसल्याचे जाणवत आहे.
गुरूवारी रात्री पाऊणेआठ वाजताच्या दरम्यान, डिझेलचा टँकर आणि कंटेनरची धडक झाली. यानंतर टँकरने पेट घेतला. यात कंटेनरमधील एक जण आजच अडकून पडला. आगीत जळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तब्बल दोन तासांनंतर दोन अग्नीशामक वाहनांच्या माध्यमातून ही आग विझविण्यात यश आले. त्यानंतर मार्ग वाहतुकीसाठी मोकळी करण्यात आली. मात्र तोवर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अडलेल्या वाहनांच्या मोठ्या प्रमाणावरील संख्येमुळे रात्रीपासून वाहतुकीची समस्या कायमच आहे. परिणामत: हा राष्ट्रीय महामार्ग ठप्प पडल्यासारखी स्थिती आहे. या राष्ट्रीय महामार्गावर भिलेवाडा ते पलाडी दरम्यान महामार्गाचे काम सुरू आहे. त्यातच अरूंद पुलावरील मार्गावरून वाहतूक सुरू आहे. दुहेरी वाहतुकीचा मार्ग नसल्याने वाहतुकीला प्रचंड अडथळा होत आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजतासुद्धा हीच परिस्थिती कायम होती. अनेक वाहने अडलेली होती. अगदी रांगल्याप्रमाणे वाहने पुढे सरकत आहेत. अडकलेल्या वाहनांना रांगेतून परत फिरणेही शक्य नाही. वाहनांमधील लहान मुलांची चांगलीच अबाळ होते आहे.