Home Artical Blog शिवराय केवळ एका जातीचे नव्हे, तर अवघ्या विश्वाचे प्रेरणास्थान

शिवराय केवळ एका जातीचे नव्हे, तर अवघ्या विश्वाचे प्रेरणास्थान

0

नागपूर(Nagpur), दि. 24 फेब्रुवारी, 2026:- “जगाच्या पाठीवर अनेक राजे होऊन गेले, ज्यांनी माणसांना गुलाम बनवून त्यांच्यावर राज्य केले. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज हे असे एकमेव युगपुरुष होते, ज्यांनी गुलामांना माणूस बनवले आणि त्यांना मुक्तीचा श्वास घ्यायला शिकवले. दुर्दैवाने आज आपण महापुरुषांना जातीच्या चौकटीत अडकवतोय, परंतु महाराजांचे कर्तृत्व कोणत्याही एका जातीपुरते किंवा मातीपुरते मर्यादित नसून ते संपूर्ण विश्वाला प्रेरणा देणारे आहे,” असे ओजस्वी प्रतिपादन प्रसिद्ध शिवव्याख्याते श्री. राहुल गिरी यांनी केले. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण व पारेषण कंपनी नागपूर परिमंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती 2026 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते.

नागपूर येथील प्रकाश भवन प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्यात ‘छत्रपतींचा पराक्रम आणि हिंदवी स्वराज्य’ या विषयावर बोलताना राहुल गिरी यांनी शिवचरित्रातील अनेक प्रेरणादायी पैलू उलगडले. ते म्हणाले की, शिवराय हे केवळ महाराष्ट्राचे नसून अखंड हिंदुस्तानाचे स्फूर्तिस्थान आहेत, असे खुद्द पंडित नेहरूंनीही मान्य केले होते. अगदी इराणच्या राजाने औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रातही अठरापगड जातींना एकत्र घेऊन सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात रयतेचे राज्य निर्माण करणाऱ्या या राजाचा गौरव केला आहे. राजमाता जिजाऊंच्या संस्कारांमुळेच ‘बाया नाचविणारा नव्हे, तर बाया वाचविणारा राजा व्हा’ ही शिकवण महाराजांनी सार्थ ठरवली. म्हणूनच ते सर्व जाती-धर्माच्या लोकांना एका ताटात घेऊन जेवणारे आणि परधर्माचा आदर राखणारे जाणते राजा ठरले. केवळ युद्धकौशल्यच नव्हे, तर शेती मोजण्याचे तंत्र विकसित करणारे, भारतीय आरमाराचे जनक आणि मानवी हक्कांचे रक्षण करणारे ते एक द्रष्टे प्रशासक होते.

व्याख्यानात पुढे बोलताना गिरी यांनी नमूद केले की, वयाच्या 15 व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात घेतलेली स्वराज्याची शपथ ही शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या शृंखला तोडण्याचा एक महान निश्चय होता. अफझलखान वध, पन्हाळगडचा वेढा आणि आग्र्याहून झालेली सुटका यांसारख्या घटनांमधून महाराजांचे बुद्धीचातुर्य आणि गनिमी काव्याचे दर्शन घडते. आजच्या बुडणाऱ्या समाजाला वाचवण्यासाठी तरुणांनी शिवचरित्राचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. युवक कसा असावा, हे शिवरायांच्या युवावस्थेतील कार्यातून शिकता येते. ज्याला आपल्या कृतीतून समाजाचे भले कसे होईल हे उमजले, त्यालाच खरे शिवचरित्र कळले असे समजावे. महाराजांचा इतिहास केवळ टाळ्या वाजवण्यासाठी नसून तो आचरणात आणण्यासाठी आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महापारेषणचे मुख्य अभियंता सतीश अणे होते, तर विशेष अतिथी म्हणून महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके उपस्थित होते. याप्रसंगी सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव, कार्यकारी अभियंता संजय श्रृंगारे, हेमराज ढोके, धम्मदिप फुलझेले, स्वप्नील गोतमारे, राहुल जिवतोडे, चंदन तल्लरवार, नरेंद्र धवड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र तिजारे यांनी केले, तर वक्त्याचा परिचय अमरदिप बागडे यांनी करून दिला. संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके संचालन अमित पेढेकर यांनी केले. या व्याख्यानाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, राहुल गिरी यांच्या वाणीने उपस्थितांमध्ये नवा उत्साह संचारला होता.

‘छत्रपतींचा पराक्रम आणि हिंदवी स्वराज्य’ या विषयावर बोलताना प्रसिद्ध शिव व्याख्याते राहुल गिरी.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर