SHRAD PAWAR शरद पवार गटातील चौघांची खासदारकी रद्द करण्याची मागणी

0

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) दोन्ही गटांकडून एकमेकांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अजित पवार गटात गेलेल्या खासदार व आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) झाल्यावर आता अजित पवार गटाने देखील नेमकी तीच भूमिका शरद पवार गटातील खासदार व आमदारांबाबत घेतली आहे.

शरद पवार गटातील नेत्यांची खासदारकी रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका अजित पवार गटानं लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींकडे केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या याचिकेत अजित पवार गटाकडून शरद पवार, सुप्रीया सुळे, अमोल कोल्हे यांची नावे वगळण्यात आली आहेत. राज्यसभेतील शरद पवार, वगळता वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. तर, लोकसभेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांना वगळून श्रीनिवास पाटील, फैजल मोहम्मद यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवार गट कुठल्यातरी संभ्रमात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शरद पवारांसह इतर काही नेत्यांनी नावे वगळण्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, यापूर्वी शिंदे गटाने देखील ठाकरे गटातील आमदार व खासदारांचे सदस्य रद्द करण्याची मागणी करताना त्यातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची नावे वगळली होती. तीच भूमिका आता अजित पवार गटाने घेतल्याचे दिसत आहे.

अमोल कोल्हेंचे तळ्यात मळ्यात

दरम्यान, शिरुर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांचे नाव अजित पवार गटाने वगळले आहे. अमोल कोल्हे नेमंके कोणत्या गटात आहे? असा प्रश्न अद्यापही कायम आहे. कोल्हे यांनी अजित पवार व शरद पवार अशा दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्र दिलेले आहे.