Shravan ST Bus Tirthatan मुंबई (Mumbai), 4 ऑगस्ट: राज्यातील एसटी महामंडळाच्या विविध आगारांच्या माध्यमातून श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे. यामाध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला यांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटनाचा आनंद घेता येणार असून महामंडळाने प्रवाशांनी या उपक्रमात जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन केले आहे. (Shravan ST Bus Tirthatan)
श्रावण महिन्यामध्ये अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्या अनुषंगाने बहुतांश नागरिक कुटुंबासह तीर्थक्षेत्राला जाण्याचे नियोजन करतात. यासाठी एसटीने ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
एसटीच्या प्रत्येक आगारातून श्रावण महिन्यात एकदिवसीय अथवा एक मुक्कामी धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये सर्व प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत. अमृतमहोत्सवी ज्येष्ठांना मोफत तर ज्येष्ठ नागरिक व महिलांना तसेच १२ वर्षाच्या आतील मुलांना अर्धे तिकीट आकारण्यात येते.
गावातील महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध सेवाभावी संस्था यांच्या पुढाकाराने अशाप्रकारे सांघिक सहलीचे आयोजन केले जाते. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, मारलेश्वर अशा तीर्थक्षेत्र बरोबरच अष्टविनायक, दर गुरुवारी नृसिंहवाडी,औदुबंर दर शनिवारी मारुती दर्शन अशा धार्मिक सहलीचे आयोजन केले जाते. सवलतीमुळे माफक दरात तीर्थाटन करण्याचा आनंद सामान्यांना मिळतानाच एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होण्यास मदत होणार आहे.
राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना प्रवासात पन्नास टक्के सवलत असे निर्णय राज्य शासनाने घेतले आहे. एसटीकडे प्रवाशांचा ओघ वाढतानाच कर्मचाऱ्यांनी चांगली सेवा आणि अभिनव उपक्रमांमुळे एसटीच्या उत्पन्नात भर पडेल अशी कामगिरी करण्याचे आवाहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी केले आहे.