
सोलापूर : गेल्याच महिन्यात एका महिलेने आपल्या चिमुकल्याचा जीव घेतल्याची घटना अद्यापही चर्चेत असताना सोलापूरमध्येही अशाच स्वरुपाची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. जन्मदात्या बापाने आपल्या १४ वर्षीय मुलाचा जीव घेतला. (Solapur Crime News) या घटनेनंतर आरोपी बापाने स्वतःहून गुन्ह्याची कबुली दिल्याचे उघडकीस आले. मुलाची हत्या करणाऱ्या बापाचे नाव विजय सिद्राम बट्टू असे आहे. १३ जानेवारी रोजी हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जानेवारीला विशाल विजय बट्टू हा मुलगा सकाळपासून घरी आला नसल्याची तक्रार आई, वडील आणि नातेवाईकांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली होती. त्याच दिवशी रात्री सोलापूरमधील तुळजापूर नाक्याजवळ एक मुलगा पोलिसांना बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
चौकशीत मृतदेह विशालचेच असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना या प्रकरणी घातपाताचा संशय आला होता. याप्रकरणी पोलिसांनी शेजारचे तसेच नातेवाईकांचीही चौकशी केली. पण संशयाची सुई वडिलांकडे वळत होती. विजयने पत्नी कीर्ति हिच्याकडे आपल्यातून मोठी चुक झाल्याची कबुली दिली होती. तिने पोलिसांच्या कानावर हा प्रकार घातला. सोलापूर पोलिसांनी विजयला ताब्यात गेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, नंतर त्याने आपला कबुली जबाब दिला. मुलाच्या हत्येमागील कारण ऐकून पोलिस अवाक झाले. विशाल अतिशय खोडकर होता. शाळेतून सतत तक्रारी यायच्या. त्यातच तो मोबाईल फोनवर नको त्या गोष्टी बघायच्या. त्यामुळे रागाच्या भरात त्याला शीतपेयामध्ये सोडियम नायट्रेट्ची पावडर पाजून त्याला ठार मारल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याचा पोलिस कोठडी रिमांड घेतला.