पुरबाधित गावावर विशेष लक्ष; साथीचे आजार टाळण्यासाठी विविध उपाययोजना

0

भंडारा,दि.31 : सातच्या पावसामुळे अनेक गावात पूर परिस्थिती आहे. संभाव्य जोखीमग्रस्थ गावावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. बहुतांश साथरोग हे दूषित पाण्यामुळे व डासांमार्फत होत असल्याने त्यात पूरपरिस्थिती ओढवल्याने साथरोगाचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. जिल्ह्यातील पुरबाधित गावावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. या गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना डॉ.मिलिंद सोमकुंवर यांनी दिल्या आहेत.

राज्यासह भंडारा जिल्ह्यातील विविध भागात गेल्या काही दिवसापासून सतत पाऊस सुरु असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने काही तालुके आणि गावांमध्ये सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागानेहि साथीचे आजार पसरू नये यासाठी नागरिकांना सतर्क राहावे असे आव्हान केले आहे. पावसाळ्याच्या दिवसात साथरोगाचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याने संभाव्य साथ रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी भंडारा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी श्री योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री समीर कुर्तकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद सोमकुंवर यांच्या नियोजनानुसार साथरोग नियंत्रण कक्ष प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा स्तरावर कार्यन्वित करण्यात आले आहे.

पावसाळ्याच्या दिवसात डेंगू,हिवताप,गॅस्ट्रो,कावीळ यासारखे साथरोग उदभवतात.या साथरोगांना आळा घालण्यासाठी साथरोग नियंत्रण,नैसर्गिक आपत्ती,पूरस्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे.

जिल्ह्यात पूरपरिस्थिती उदभवणाऱ्या गावांमध्येही उपाययोजना केल्या जात आहे. पुरग्रस्थ भागात गावोगावी आरोग्य विभागामार्फत आरोग्य शिबिराचे आयोजन करून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. किरकोळ आजारावर उपचार करून संशयित रुग्णाचे रक्त नमुन्याची तपासणी करण्यात येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर जलजन्य व कीटकजन्य आजाराच्या साथी पसरतात. पावसाळ्यात पाण्याचे स्रोत दूषित होतात.

त्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, विषाणूजन्य कावीळ,विषमज्वर या आजाराचे रुग्ण मोठ्या आढळतात. ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासाची उत्पत्ती होऊन हिवताप,डेंगू,चिकनगुण्या सारखे आजार वाढतात.त्यामुळे या आजारांना आळा घालण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियमित सर्वेक्षण करावे व सर्वेक्षणाच्या काळात नागरिकांना साथरोगाबाबत मार्गदर्शन करून मोठ्या प्रमाणात प्रचार,प्रसिद्धी करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद सोमकुंवर यांनी दिल्या आहेत. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून औषधाचा बफर साठा करण्यात आला आहे. गरोदर मताची विशेष व्यवस्था करण्यात अली असून ज्या महिलांची बाळंतपणाची तारीख जवळ आहे त्यांना जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. पूर ओसरल्यावर सुद्धा साथरोग होऊ नये म्हणून उपाययोजना आखण्यात आल्या आहे.