(Amravti)अमरावती – अमरावती जिल्ह्यातील राडगाव ते रामगाव रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तीन किलोमीटरचा हा रस्ता अतिशय दुरावस्थेत आहे. अनेकदा शासकीय कार्यालयाची पायपीट करून देखील रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने या रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. नागरिकांनी आज रस्त्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर अचानक धडक दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक आंदोलन सुरू झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. या गावातील विद्यार्थ्यांना देखील या खड्यांमुळे रस्त्यातून प्रवास करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रामगाव या गावात अनुसूचित जाती समुदायाचे नागरिक राहत असल्याने या गावात विकास कामे होत नसल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली. तातडीने रस्ता बनवण्यात यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांनी यावेळी दिला आहे.