निवडणुकींमधील यश भाजपाच्या विकास कार्यामुळे..!

0

-डॉ. आशीष देशमुख, सुधाकर कोहळे यांचा जिल्ह्यातील २४८ ग्रामपंचायतींवर दावा

नागपूर- नागपूर जिल्ह्यातील ३६१ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाच्या आणि सदस्यपदाच्या निवडणुकित 248 जागांवर भाजपने विजय मिळविला. ५ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध सरपंच निवडून आले यात ४ सरपंच भाजप विचारधारा मानणारे आहेत. ग्रामीण भागात केलेल्या विकासकामांना, जनतेने भाजपाला कौल दिला असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी आमदार व ओबीसी मोर्चाचे प्रभारी डॉ आशीष देशमुख यांनी पत्रपरिषदेत केला.यानिमित्ताने ढोलताशांच्या गजरात फेर धरत,फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. नळ योजना, पांदन रस्ते, २५/१५ रस्ते अशा प्रकारचे अनेक ग्रामीण विकासाचे कार्य नागपूर जिल्ह्यात मागील एका वर्षात जलदगतीने झालेले आपल्याला बघायला मिळतात.

महाविकास आघाडीच्या काळात माजी मंत्री सुनील केदार असो, अनिल देशमुख असो किंवा नितीन राऊत असो या मंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे आणि त्यांनी नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विकासाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे कामे थांबली होती. भाजपा आल्यानंतर वर्षभरात या कामांना गती मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना याचे श्रेय जाते.

शेतकरी सन्मान योजना, उज्वला गॅस योजना, लेक लाडकी योजना, महिला सशक्तीकरण, महिलांसाठी सवलतीच्या दरात व वृद्धांसाठी निःशुल्क बस-सेवा, कौशल्य विकास, विश्वकर्मा योजना, ओबीसींसाठी घरकुल योजना अशा अनेक योजनांमुळे भाजपाने राज्यातील जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला. काटोल विधानसभा क्षेत्रात ८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या, यातील ५९ सरपंच भाजपाचे निवडून आले. निष्क्रिय असलेले अनिल देशमुख यांना काटोलची जनता कंटाळलेली आहे. सावनेर विधानसभा क्षेत्रात ४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या, त्यात २५ सरपंच भाजपाचे आले आहेत. सावनेरमध्ये सुनील केदार यांची धूळधाण झालेली आहे.

उमरेड विधानसभा क्षेत्रात ८४ पैकी ५८, कामठी विधानसभा क्षेत्रात ४२ पैकी ३१, रामटेक विधानसभा क्षेत्रात ५२ पैकी २६ आणि हिंगणा विधानसभा क्षेत्रात ५३ पैकी ३८ सरपंच भाजपाचे निवडून आले असून सर्वत्र भाजपाचे वर्चस्व दिसत आहे. बहुमताने ग्रामपंचायत सदस्य देखील निवडून आले आहेत. विजय वडेट्टीवारांच्या क्षेत्रातसुध्दा भाजपाने मुसंडी मारली आहे. ग्रामपंचायत निवडणुकींमधील हे मोठे यश भाजपाच्या विकास कार्यामुळेच मिळाले यावर भाजपाचे प्रवक्ते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी भर दिला.
पत्रपरिषदेला माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, जि.प. माजी अध्यक्षा सौ. संध्याताई गोतमारे प्रामुख्याने उपस्थित होते.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा