नागपूर – मनी लॉंड्रींग व खंडणी वसुलीच्या आरोपावरून वर्षभर कारागृहात राहिलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे (NCP to felicitate Anil Deshmukh) शनिवारी दुपारी नागपुरात आगमन होत असून त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीने जय्यत तयारी केली आहे. दुपारी तीन वाजता देशमुख यांचे मुंबईहून विमानाने नागपुरात आगमन होत आहे. राष्ट्रवादीतर्फे मिरवणूक काढून त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. ढोलताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने देशमुख यांचा जामीन मंजूर केलाय. याशिवाय, विशेष न्यायालयाने त्यांना नागपुरात येण्याची परवानगी देखील दिली आहरे.
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली की, दुपारी तीन वाजता देशमुख यांचे नागपुरात आगमन होणार असून नागपूर राष्ट्रवादीच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. त्यांना विमानतळावरून मिरवणुकीने आणले जाणार आहे. वर्धा मार्गावर देशमुख हे साईमंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर व्हरायटी चौकातील महात्मा गांधी आणि संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून ते जीपीओ चौकातील आपल्या श्रद्धा बंगल्यात दाखल होणार आहेत. यादरम्यान अनेक चौकांमध्ये लाडू वितरण करण्यात येणार आहे. मिरवणुकीवर पुष्पवर्षाव करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी दिली.
न्यायालयाच्या निरीक्षण पत्रकांचे वितरण
जामीन मंजूर करताना ईडी आणि सीबीआयच्या आरोपांवर सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेले नेमके काय निरीक्षण नोंदविले, याची माहिती देणारे पत्रक नागपूर शहरासह काटोल-नरखेड विधानभा मतदारसंघातील घरोघरी पोहोचवले जात असल्याचे राष्ट्रवादीच्या वतीने सांगण्यात आले.