औरंग्याचे उदात्तीकरण; आझमीला तत्काळ निलंबित करा : सुधीर मुनगंटीवार

0

छत्रपती संभाजी महाराजांचा अमानवी छळ करून त्यांची हत्या करणाऱ्या औरंगजेबचे उदात्तीकरण या राज्यात खपवून घेतले जाणार नाही. औरंगजेबची महाराष्ट्रातील कबर नष्ट केली पाहिजे व औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्या अबु आझमी या आमदाराला तात्काळ निलंबित केले पाहिजे, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज (मंगळवार, दि. ४ मार्च २०२५) विधानसभेत केली.

समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांनी औरंगजेबची महानता सांगताना त्याच्या काळात अनेक चांगलेच निर्णय झाले. त्यांच्या काळात उत्तम प्रशासक म्हणून औरंगजेबची ओळख होती, असं म्हटलं आहे. आमदार आझमी यांच्या या विधानांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. महायुतीचे सदस्य आक्रमक झाले आहेत. आमदार अबु आझमी यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी अनेक सदस्यांनी विधानसभेत केली.

यासंदर्भात विधानसभेत आज सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली. आमदार अबु आझमी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘हरामखोर याचा अर्थ इंग्रजीत नॉटी Naughty होतो. असा नॉटी असलेला औरंग्या काहींसाठी उत्तम प्रशासक आहे. ज्याने आपल्या बापाला कारागृहात ठेवले व सख्खा भाऊ दारा शुकोहचा खून केला. त्याचे उदात्तीकरण कसे होऊ शकते? या औरंग्याची महाराष्ट्रात असलेली तुटकीफुटकी कबर तोडण्याचा निर्णय आज झाला पाहिजे.’ ज्या औरंग्यांने संभाजी महाराजांचा अमानवी छळ केला. ज्याने हिंदूंवर जिझीया कर लावला, ज्याने हिंदू महिलांवर अत्याचार केला. अशा व्यक्तीचे एखादा आमदार आपल्या मतांच्या राजकारणासाठी तुष्टीकरण करीत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. ‘धर्मचक्र प्रवर्तनाय’ हे विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीमागे लिहिलेले आहे. याच सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र लागलेले आहे. अध्यक्षांनी आता संविधानाचा दांडपट्टा काढण्याची आवश्यकता आहे. अशा विचाराचे या दांडपट्ट्यानी तुकडे तुकडे झाले पाहिजे, असं मुनगंटीवार म्हणाले.

छेडछाड प्रकरण हा खुनापेक्षाही गंभीर गुन्हा – सुधीर मुनगंटीवार

महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित करताना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छेडछाड प्रकरण खुनापेक्षाही गंभीर गुन्हा असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच, मुलींच्या सुरक्षेसाठी कायद्यात सुधारणा करण्याची गरज असून, हा विषय विधीमंडळ अधिवेशनात मांडला जाईल, असेही त्यांनी सांगितले. रक्षा खडसे यांच्या मुलीच्या संदर्भात घडलेला प्रसंग अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगताना त्यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत का, याचा विचार करावा लागेल, असे मत मांडले. “रक्षा” हे त्यांच्या नावातच आहे, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (MSP) मिळाली पाहिजे. यासंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित केला जाईल आणि सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंडे प्रकरणावर भाष्य
करुणा मुंडे यांच्या वक्तव्यावर त्या स्वतः प्रतिक्रिया देतील. मुख्यमंत्र्यांच्या चौकशीनंतर तथ्य आढळल्यास कारवाई केली जाईल, त्यामुळे थोडी वाट पाहावी लागेल, असे मुनगंटीवार म्हणाले.

दानवे आणि चंद्रकांत पाटील यांच्याविषयी बोलताना, संसदीय मंत्र्यांच्या जबाबदारीबद्दल त्यांनी भाष्य केले. सर्वांशी संवाद ठेवणे आणि कोणत्याही संवादाचा सेतू तुटू नये, यासाठी ते दोन्ही बाजूंमध्ये मध्यस्थी करतात, असे त्यांनी सांगितले.

गुन्हेगारांचे फोटो काढण्यावर भूमिका
राजकीय व्यक्तींनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर राहावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. “आम्हाला माहिती असेल की एखादी व्यक्ती गुंड प्रवृत्तीची आहे, तर तिच्यासोबत फोटो काढणे योग्य नाही. छत्रपतींबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांविरोधात पोलीस काय कारवाई करतात, हेही आम्ही पाहत आहोत,” असे ते म्हणाले.

देशातील विविध राज्यांतील वाहनांच्या नंबर प्लेटच्या दरांबाबत माहिती घेण्यासाठी केंद्रीय सरकारकडे विचारणा केल्याचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात विशिष्ट कंपन्यांना काम देण्यात येते का, आणि जिल्हास्तरावर त्याचे वाटप करता येईल का, यावर अभ्यास करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी नमूद केले.