Home Artical Blog ‘कार्यालयीन कर्तव्यासोबतच स्वतःच्या आरोग्याची जपणूक करा’, महावितरणमध्ये उत्साहात साजरा जागतिक महिला दिन

‘कार्यालयीन कर्तव्यासोबतच स्वतःच्या आरोग्याची जपणूक करा’, महावितरणमध्ये उत्साहात साजरा जागतिक महिला दिन

0

नागपूर(Nagpur), दि. 10 मार्च 2026: महावितरणच्या नागपूर परिमंडलातर्फे यंदाचा जागतिक महिला दिन अतिशय उत्साहात आणि महिलांच्या आरोग्याप्रती सजगता निर्माण करणाऱ्या उपक्रमांसह साजरा करण्यात आला. काटोल रोड येथील विद्युत भवन कार्यालयात आयोजित या विशेष कार्यक्रमात, महिलांनी आपल्या कार्यालयीन कर्तव्याचे वहन करतानाच आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन ज्येष्ठ रक्तविकारतज्ज्ञ डॉ. प्रिया बल्लीकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके होते, तर याप्रसंगी अधीक्षक अभियंता संजय वाकडे, महेश वैद्य, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव, कार्यकारी अभियंता महेश चतुर्वेदी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) सुधीर टेकाम, प्रणाली विशेषज्ञ प्रविण काटोले, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर उपस्थित होते. यावेळी सर्व महिला कर्मचाऱ्यांचे गुलाब पुष्प आणि पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. प्रिया बल्लीकर यांनी सध्याच्या जीवनशैलीतील बदलांवर आणि त्याचे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, खानपानातील बदल आणि व्यायामाचा अभाव यामुळे महिलांमध्ये कर्करोगासह विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नोकरी आणि घर सांभाळताना स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष न करता, दैनंदिन जीवनात लोह, खनिजे आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. तसेच, जंक फूड आणि व्यसनांपासून दूर राहून निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा. विशेषतः विदर्भातील महिलांनी सिकलसेल आणि थॅलिसिमिया या आजारांच्या निदानासाठी सार्वजनिक स्क्रीनिंग प्रक्रियेत सहभागी होण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

महावितरणच्या महिला सबलीकरणाच्या धोरणांचा उल्लेख करताना मुख्य अभियंता दिलीप दोडके म्हणाले की, वीज वितरण क्षेत्रात महिलांना 33 टक्के आरक्षण देणारी महावितरण ही देशातील पहिली कंपनी आहे. महिलांच्या योगदानामुळे संस्थेची कार्यक्षमता अधिक बळकट झाली असून, महावितरण नेहमीच महिलांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. याप्रसंगी अधीक्षक अभियंता संजीव वाकडे यांच्यासह रिता ठाकरे, अनिता जपे, नेहा निचत आणि मनिषा बागुल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचलन आणि आभार प्रदर्शन अमित पेढेकर यांनी केले.

महिला दिनाचे औचित्य साधून परिमंडलातर्फे विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वॉकहार्ट हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात हाड तपासणी, रक्तदाब, मधुमेह आणि अशक्तपणा यांसारख्या विविध चाचण्या करण्यात आल्या, ज्याचा लाभ 50 पेक्षा अधिक महिलांनी घेतला. दुसरीकडे, महावितरणच्या काटोल विभागातही महिला दिन उत्साहात साजरा झाला. तिथे ज्येष्ठ आहारतज्ज्ञ डॉ. सीमा चलखोर यांनी महिलांना त्यांच्या कामाच्या ताणानुसार योग्य आहार आणि आरोग्याची काळजी घेण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता दिपक आघाव, अतिरिक्त कार्यकारी अभियंता वर्षा जीवतोडे, उपकार्यकारी अभियंता धीरज मेश्राम व पवन नंदरघने यांचेसह स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महावितरण मध्ये आयोजित कार्यक्रमाप्रसंगी डॉ, प्रिया बल्लीकर, मुख्य अभियंता दिलीप दोडके व इतर मान्यवर

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर