
बेमुदत उपोषणाचा इशारा
वाडी, नागपूर(Nagpur) १५ फेब्रुवारी: नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या शिक्षण उपसंचालकांना विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले असून, सोमवार १६ फेब्रुवारीपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
संघाच्या वतीने अध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शिक्षक व पेन्शनधारकांच्या अत्यंत महत्त्वाच्या व जिव्हाळ्याच्या मागण्यांबाबत वारंवार निवेदने देऊन तसेच प्रत्यक्ष घेऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. संघाच्या
प्रमुख मागण्यांमध्ये महिन्याच्या १ तारखेला शिक्षक व पेन्शनधारकांचा पगार व पेन्शन नियमितपणे अदा करणे, सन २०२२ पासून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे प्रलंबित उपदान त्वरित देणे, वैद्यकीय प्रतिपूर्तीची सर्व प्रलंबित बिले मंजूर करून अदा करणे समावेश आहे. तसेच सन २०२२ पासून प्रलंबित असलेली वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी व पदविधर वेतन श्रेणी लागू करणे, शिक्षक सेवकांची थकबाकी अदा करणे आणि एकस्तर व चटईक्षेत्र थकबाकी तात्काळ देणे, या मागण्यांचाही समावेश आहे.
वरील मागण्यांकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. काही दिवस साखळी उपोषण करूनही मागण्या मान्य न झाल्याने संघाच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा ठाम निर्णय घेण्यात आल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.















