उद्धव ठाकरेंच्या 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

0

मुंबई (Mumbai), 27 मार्च : शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे) पक्षाने आज, बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. सांगलीतून उबाठा-गटाचे चंद्रहार पाटील मैदानात उतरणार आहेत. तर नाशिकमधून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केलीय.

उबाठा-गटाचे संजय राऊत यांनी 17 उमेदवारांची यादी ट्विटरवर जाहीर केलीय. राऊत यांनी जाहीर केलेल्या यादीत वादाचा विषय ठरलेल्या दक्षिण मध्य मुंबई, सांगली लोकसभा मतदारसंघासह एकूण 17 जागांचा समावेश आहे. बऱ्याच वाटाघाटीनंतर सांगली अखेर शिवसेनेनं राखली आहे. तर, काँग्रेसने दावा केलेला दक्षिण मध्य मुंबई हा मतदारसंघही शिवसेनाच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याठिकाणी अनिल देसाई यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. शिवसेनेच्या उबाठा-गटाने जाहीर केल्यानुसार नरेंद्र खेडेकर (बुलढाणा), संजय देशमुख (यवतमाळ-वाशिम), संजोग वाघेरे-पाटील (मावळ), चंद्रहार पाटील (सांगली), नागेश पाटील-आष्टीकर (हिंगोली), चंद्रकांत खैरे (छत्रपती संभाजीनगर), ओमराजे निंबाळकर (धाराशीव), भाऊसाहेब वाघचौरे (शिर्डी), राजाभाऊ वाजे (नाशिक), अनंत गीते (रायगड), विनायक राऊत (रत्नागिरी-सिंधुदुर्ग), राजन विचारे (ठाणे), संजय दिना पाटील (ईशान्य-मुंबई), अरविंद सावंत (मुंबई दक्षिण), अनिल देसाई (मुंबई दक्षिण मध्य), अमोल कीर्तीकर (वायव्य-मुंबई), संजय जाधव (परभणी) यांना उमेदवारी दिली आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात हातकणंगले लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडं आहे. तिथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेनं व महाविकास आघाडीने तिथे आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, शेट्टी हे महाविकास आघाडीत येणार असतील तरच त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू असे मविआचे म्हणणे आहे. त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने शिवसेनेने तिथून उमेदवार जाहीर करणे टाळले आहे