Home Artical Blog विनोद देशमुखांच्या याचिकेवरील लवादाच्या निर्णयाने…..

विनोद देशमुखांच्या याचिकेवरील लवादाच्या निर्णयाने…..

0

वि. सा. संघ निवडणुकीतील
घोटाळ्यांवर शिक्कामोर्तब !

नागपूर (प्रतिनिधी) : विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत आरमोरी (गडचिरोली) येथील 4 तक्रारकर्त्या मतदारांना नव्याने मतपत्रिका देऊन मतदान करवून घ्या आणि त्यांच्या नावावर याआधी झालेले खोटे मतदान रद्द ठरवा, असा आदेश या निवडणुकीचे लवाद ॲड. मल्हार विश्वरूपे यांनी दिल्याने या निवडणुकीतील आरोपित गैरप्रकारांवर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे.
डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या नेतृत्वाखालील “वि. सा.‌संघ बचाव” पॅनलचे कार्यकारिणी उमेदवार, ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख यांनी यासंदर्भात सादर केलेल्या याचिकेवर लवादाने हा निर्णय दिला. अनेक लोक गुंतलेले हे प्रकरण संघटित गुन्हेगारीचे असल्याने आणि चोरीची मते मतपेटीत टाकणारे सृजन सेतू पॅनलचे दोन कार्यकारिणी उमेदवार नरेश गडेकर आणि अनिल इंदाने (डॉ. गो. नी. हडप प्रकरण) यांनी स्वत:च गिरीश गांधी यांचे नाव घेतल्याने त्यांची अध्यक्षपदाची उमेदवारी रद्द ठरवावी, ही मागणी मात्र लवादाने फेटाळली. तसेच, याप्रकरणांमध्ये गुन्हे नोंदविण्याचा निर्देश देण्याबाबत कोणतेही भाष्य केले नाही.
आरमोरीच्या पोस्टातून झालेल्या मतचोरीचे हे प्रकरण धक्कादायकच आहे. 10 मतदारांच्या मतपत्रिका टपालाने त्यांच्या घरी पोहोचल्या नाहीत. त्यातील चौघांनी- डॉ. महेश कोपुलवार, सौ. स्वाती भातकुलकर, सुधीर भातकुलकर आणि विजयकुमार ठवरे यांनी- चौकशी केली तेव्हा कळले की, एका राजकीय नेत्याच्या गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेतील कर्मचारी गुणवंत दहीकर याने 10 मतपत्रिकांचा गठ्ठाच पोस्टमनकडून नेला. याची तक्रार पोस्टमास्तरकडे करण्यात आली तेव्हा पोस्टमास्तरने लेखी उत्तर दिले- “मतपत्रिका दहीकरने नेल्या. पण आता तो गहाळ झाल्याचे सांगत आहे !”
या गंभीर प्रकरणी विनोद देशमुख यांनी लवादाकडे याचिका दाखल केली होती. लवादाने मतवंचितांना दिलासा दिला खरा. परंतु, या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित पोस्टमन, दहीकर आणि या कारस्थानाचे सूत्रधार यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे, अशी देशमुखांची मागणी आहे. सिद्ध झालेल्या या घटनेने वि. सा. संघ निवडणुकीतील गडबडघोटाळा पुराव्यानिशी चव्हाट्यावर आला आहे. मतपत्रिकांची पळवापळवी, खोटे मतदान, मृतांच्या नावाने मतदान असे गैरप्रकार सर्रास झाल्याचे आरोप गेले काही दिवस होत आहेत. आज मतदानाचा शेवटचा दिवस असून, उद्या मतमोजणी आहे.