नागपूर(Nagpur)6 ऑगस्ट
संपूर्ण भारतात भ्रमण करून वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांच्या जाती, त्यांचे व्यवसाय, उदरनिर्वाहाची साधनं आणि त्याचा मान्सूनशी असलेला संबंध याचं त्यांनी केलेलं नेमकं निरीक्षण सुनील तांबे यांनी त्यांच्या आगामी ‘मान्सूनः जन, गण आणि मन’ या पुस्तकातून अभ्यासपूर्ण आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मांडले. त्यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनाने श्रोते समृद्ध झाले.
विदर्भ साहित्य संघातर्फे ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात मुंबईचे लेखक, पत्रकार आणि अनुवादक सुनील तांबे यांनी त्यांचे आगामी पुस्तक ‘मान्सून ः जन, गण आणि मन’ यातील निवडक भागाचे वाचन केले.
विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथालयात आयोजित या कार्यक्रमात वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, सरचिटणीस विलास मानेकर, विवेक अलोणी आदी मान्यवर उपस्थित होते. सुनील तांबे यांचे वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी पुस्तक देऊन स्वागत केले.
पुस्तकातील कथेचे वाचन करताना त्यात उल्लेखित केलेल्या सिंधू संस्कृतीबाबतची त्यांनी माहिती दिली. मोहेंजोदडोत सापडलेल्या वस्तूंबाबत त्यांनी पुस्तकात विश्लेषण केलेले आहे. सिंधू संस्कृतीत खरीप आणि रब्बी हंगामात पिके घेतली जायची. दुबार पिके ही फक्त भारतातच घेतली जातात. सिंधू संस्कृतीतील अनेक गोष्टी आजही आपल्या व्यवहारात दिसतात. शेतीच्या तंत्रज्ञानात अनेक बदल झाले आहेत परंतु आजही नैसर्गिक शेती केली जाते. आजही मान्सूनवर शेती अवलंबून आहे. सात आसरा या लेखाचे वाचन करताना त्यात त्यांनी काही परंपरांचा उल्लेख केला आहे. भारतात 1950 साली कॅलेंडर डिफॉर्म समिती कशी स्थापन झाली. एका कथेत कास्ट या शब्दाची उत्पत्ती आणि त्याचे परिणाम याचा उल्लेख त्यांनी केला आहे. पूर्वी जहाजांद्वारे होणारी वाहतूक ही संपूर्णपणे मान्सूनवर अवलंबून होती. धर्मावर आधारित आणि जातीवर आधारित मतदार संघ इंग्रजांनी निर्माण केल्याचा उल्लेख त्यांनी केला. भौगोलिक परिस्थिती, भारताचा इतिहास, येथील लोकांची संस्कृती, परंपरा याबाबत त्यांचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे.
यावेळी उपस्थित श्रोत्यांनी पर्यावरणाचा होणारा परिणाम, राजकारण आणि जातींचा संबंध, नैसर्गिक वातावरण आणि व्यवसाय, भारताचा इतिहास याबाबत काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन प्रफुल्ल शिलेदार यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.