अवामी लीगच्या २० नेत्यांचे मृतदेह सापडले
बांगलादेशात विद्यार्थ्यांनी सुरु केलेले आंदोलन हिंसक
विद्यार्थ्यांनी सुरु केलेले आंदोलन आता आणखीनच हिंसक बनू लागले असून शेख हसीना यांनी राजीनामा देऊनही काही शांत होऊ शकलेले नाहीय. विद्यार्थी नेत्यांनी आंदोलन हायजॅक होण्याची भीती व्यक्त केली होती आणि आता तेच होऊ लागले आहे. सत्ताधारी अवामी लीगच्या नेत्यांवर हल्ले केले जात असून देशभरातून २० अवामी लीगच्या नेत्यांचे मृतदेह सापडले आहेत. अवामी लीगच्या अनेक नेत्यांच्या घरांवर आणि उद्योग धंद्यांवर हल्ले केले जात असून लुटालुट सुरु आहे. यामुळे अवामी लीगच्या नेत्यांमध्ये पळापळ सुरु झाली आहे. दोन मंत्र्यांना विमानतळावरून देश सोडण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेण्यात आले आहे. काही नेते रविवारी रात्रीच पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.
बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार
उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारवर टीका
“बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत, त्या संदर्भात काय इशारा द्याल? बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असतील, त्या बातम्यात येत आहेत, हे खरं असेल तर अधिवेशन सुरू आहे. काल-परवा सर्वपक्षीय बैठक गृहमंत्र्यांनी बोलवली होती. जी माहिती तुमच्याकडून मिळतेय, तीच माहिती त्या बैठकीत मिळत असेल तर अर्थ नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची अधिकृत बैठक झालेली नाही. अधिवेशन सुरु असल्याने I.N.D.I.A. आघाडीतील सर्व पक्षांचे प्रमुख नेते दिल्लीत आहेत. आम्ही I.N.D.I.A. आघाडी म्हणून एकसंधपणे लढणार, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी करीत बांगलादेशात हिंदूंवरील हल्ल्यावर सरकारला घेरले. बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होत असतील तर सरकारने पावलं उचलली पाहिजेत. तेथील हिंदूंच्या रक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी. शेख हसीना यांना भारतात आश्रय देताय, मग केंद्राने बांगलादेशमधील हिंदूंचं संरक्षण करावं, ती सरकारची जबाबदारी आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.
अमृतसरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं महाअधिवेशन
ओबीसींच्या मागण्यांचे 30 ठराव मंजूर करणार
अमृतसरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय महाअधिवेशन पार पडत आहे. ओबीसींच्या मागण्यांचे 30 ठराव अधिवेशनात मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नववे राष्ट्रीय अधिवेशन आज 7 ऑगस्टला पंजाबमधील अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाच्या गोल्डन ज्युबिली कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना, ओबीसी क्रिमिलेअर मर्यादावाढ, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, आरक्षणासाठी 50 टक्क्यांची अट रद्द करा यासह समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने मंथन होईल. समारोपीय सत्रात या अनुषंगाने ठरावही पारित केले जाणार आहेत.
9 ऑगस्ट क्रांतीदिनी संभाजीनगरात आक्रोश मोर्चा
बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहारचा आंदोलन
9 ऑगस्ट क्रांतीदिनी संभाजीनगरात बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहारचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत प्रहारची लक्षवेधी बॅनरबाजी करण्यात आली असून प्रहारकडून सरकारच्या कामगिरीवर ताशेरे ओढण्यात आले. दिव्यांग शेतकरी शेतमजूर यांच्या हक्कासाठी बच्चू कडूंचा संभाजी नगरात आक्रोश मोर्चा. संपूर्ण राज्यातून लोक संभाजी नगरात 9 ऑगस्ट रोजी दाखल होतील.
विनेश फोगाटला ऑलिम्पिकने अपात्र घोषित
वजन ५० किलो पेक्षा जास्त भरले
पॅरिस ऑलिम्पिकमधून मोठी धक्कादायक बातमी येत आहे. विनेशने महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत क्युबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुझमनचा ५-० असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतू ती ५० किलोच्या गटात बसत नसल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले आहे. विनेशला भारताची पहिली ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू बनण्याची संधी मिळाली होती. विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आल्याने भारतीयांना धक्का बसला आहे. विनेशचे वजन ५० किलोपेक्षा जास्त भरत आहे. रात्रभर तिचे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. मात्र तरीही आज सकाळी तिचे वजन ५० किलो पेक्षा जास्त भरले. यामुळे विनेशला ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित करण्यात आले आहे.
राज्यसभा निवडणुकीची तारीख जाहीर
निवडणूक आयोगाकडून माहिती
निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. उदयनराजे भोसले आणि पियूष गोयल यांच्या जागेवर निवडणूक होणार आहे. 3 सप्टेंबर रोजी मतदान आणि मतमोजणी केली जाणार आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने 9 राज्यांमधील राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. राजस्थान, हरियाणा, बिहार, आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, त्रिपुरा, तेलंगणा आणि ओरिसा या राज्यांतील 12 जागांवर निवडणूक होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 14 ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे, तर 21 ऑगस्ट हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 22 ऑगस्ट रोजी छाननी होणार आहे. आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि त्रिपुरामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट असेल तर बिहार, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा आणि ओरिसामध्ये उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. या सर्व जागांवर ३ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता निकाल जाहीर होणार आहे.