
बॉलिवूडमध्ये केले दमदार पदार्पण
नागपूर ( Nagpur) :- मूळची नागपूरची असलेली आणि सध्या मुंबईत स्थायिक झालेली अवघ्या ११ वर्षांची गायिका, निवेदिका व बालअभिनेत्री अवनी जोशी हिने बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केले आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली ‘मर्दानी ३’ या हिंदी चित्रपटात ती प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.
प्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी आणि रसिका जोशी यांची अवनी ही कन्या आहे. आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ती संगीताचे शिक्षण घेत आहे.
वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद’ या कार्यक्रमात अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत तिने केलेले खुमासदार सूत्रसंचालन तिच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट ठरले.
मालिका आणि चित्रपटांमधील प्रवास
अवनीने तुझेच मी गीत गात आहे, एक होती राजकन्या, साथ दे तू मला यासारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केले असून मराठी चित्रपट ‘जारण’ मधील तिची मध्यवर्ती भूमिका विशेष लक्षणीय ठरली आहे.

दिग्गज कलाकारांसोबत अभिनयाचा अनुभव…
वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षापर्यंत तिने सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. यामध्ये राणी मुखर्जी, विक्रम गोखले, सचिन पिळगावकर, अमृता सुभाष, सौमित्र, सिद्धार्थ जाधव, सिद्धार्थ चांदेकर, अभिजीत खांडकेकर, उर्मिला कानेटकर आणि प्रिया मराठे यांसारख्या मातब्बर कलाकारांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या अनुभवी कलाकारांसोबत काम करताना अवनीने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. त्यासाठी अवनीचे विशेष कौतुक होत आहे.

अभिनय आणि कार्यक्रमांच्या निमित्ताने अवनीने आतापर्यंत अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि दुबई यांसारख्या देशांचे यशस्वी दौरे केले आहेत.
अष्टपैलू बालकलाकार अवनी जोशीचा कला क्षेत्रातील प्रवास प्रेरणादायी असून नागपूरकरांसाठी अभिमानास्पद ठरला आहे.















