
गिरीश गांधींना चौफेर विरोध
नागपूर (Nagpur) :-
विदर्भातील ख्यातनाम साहित्यिक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाची निवडणूक कधी नव्हे एवढी यंदा गाजणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कालावधीतच होत असलेली वि.सा. संघाची निवडणूक यंदा साहित्य व साहित्यिकांच्या परिघाबाहेर देखील चर्चेची ठरते आहे. याला प्रमुख कारण साहित्य क्षेत्राशी काडीचाही संबंध नसलेल्या गिरीश गांधी यांच्या अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीचे लाभले आहे. विशेषतः, गिरीश गांधी यांनी आपल्या उमेदवारीसाठी नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनीच आग्रह धरल्याचे जे कारण पुढे केले त्यामुळे तर राजकीय क्षेत्रात देखील या निवडणुकीला चर्चेचा मंच प्राप्त झाला आहे.

गेली अनेक वर्ष वैदर्भीय साहित्य क्षेत्रातील नामवंत संस्था म्हणून विदर्भ साहित्य संघ कार्यरत आहे. मात्र काही वर्षांपूर्वी नागपूरच्या बर्डी परिसरात उभारण्यात आलेल्या या संस्थेच्या इमारतीने अनेक रंजक कथा निर्माण केल्या आणि साहित्यापलीकडच्या राजकारणाचे रंग या संस्थेला लागले. विदर्भ साहित्य संघाची इमारत उभारण्यासाठीचे कंत्राट लाभलेली व्यक्ती, करारानुसार या इमारतीचे बांधकाम आज इतक्या वर्षानंतरही पूर्ण न होणे आणि आता याच जागेवर जुनी इमारत पाडून नवी इमारत उभी करण्याचा, त्याचे कंत्राट एका मुंबईकराला देण्याचा घाट घालण्यासाठी साहित्य संघाच्या कार्यकारिणीचा आशीर्वाद मिळविणे आवश्यक असल्याने कार्यकारणीत ‘होयबा’संस्कृतीशी मेळ खाणारी ‘आपली’ माणसं विविध पदांवर स्थानापन्न करण्यासाठी जुन्या कंत्राटदाराने देखील पुढाकार घेतला असल्याची चर्चा आहे. साहित्य क्षेत्रापलीकडचे गिरीश गांधी यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे आणण्यात देखील याच कंत्राटदाराची महत्त्वाची भूमिका असल्याची देखील चर्चा साहित्य वर्तुळात आहे. साहित्य, वाङमय याच्याशी काडीचाही संबंध नसलेले गिरीश गांधी विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास तयार झाले, इतकेच नव्हे तर यासाठी आपल्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच आग्रह धरला असल्याचे सांगत वातावरण निर्मिती करण्याचा देखील प्रयत्न त्यांच्याकडून झाला. मात्र आपला या निवडणुकीशी काहीही संबंध नाही असे गडकरींनी जाहीर केल्यानंतर संबंधितांना वातावरण निर्मिती करण्यात आपसूकच अपयश आले. शिवाय गांधी यांच्या नावाला साहित्यिक वर्तुळातूनही मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला. कार्यकारणीतील बावीस जागांसाठी तब्बल अकराशे अर्ज प्राप्त होण्याची अफलातून किमया यंदा घडली आहे. एका अध्यक्षपदासाठी आज घडीला तब्बल जणांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. निवडणूक टळावी, जेणेकरून संस्थेचे पैसे वाचतील अशी भूमिकाही काहींनी घेतली आहे. त्याबाबत बऱ्याच जणांची सहमती असली तरी ‘गांधी नकोत’ या भूमिकेवर मात्र सर्वांचे एकमत झालेले दिसते आहे. एरवी पत्रकारांचे लाडके मित्र असलेले गिरीश गांधी यांना यंदा मात्र माध्यमकर्मींकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. विशेषतः विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांनी देखील गिरीश गांधी यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता गिरीश गांधी आपली उमेदवारी मागे घेतात की शड्डू ठोकून मैदानात उतरतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आज घडीला अध्यक्षपदासाठी श्रीपाद भालचंद्र जोशी, नरेश गडेकर, प्रदीप दाते, डॉ. रवींद्र शोभणे, लखन सिंह कटरे, डॉ. पिनाक दंदे, श्रीपाद अपराजित, प्रमोद भुसारी, सतीश तराळ, डॉ. रंजन दारव्हेकर यांनी तर कार्यकारणीतील अन्य पदांसाठी तब्बल १११ जणांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. ९ फेब्रुवारी रोजी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने निवडणुकीचे वास्तविक चित्र त्यानंतरच स्पष्ट होणार आहे. पण आज तरी ही निवडणूक गिरीश गांधी यांच्या उमेदवारीमुळे गाजते आहे.














