Home Artical Blog ग्रामीण भागातील लोकांचा ‘हॅपी ह्युमन इंडेक्स’ वृद्धींगत होईल – नितीन गडकरी

ग्रामीण भागातील लोकांचा ‘हॅपी ह्युमन इंडेक्स’ वृद्धींगत होईल – नितीन गडकरी

0

नागपुरात पहिल्‍या ‘एकल हब’ प्रकल्पाचे उद्घाटन
सिने चौरंगीने केला संपूर्ण महाराष्ट्रात विस्ताराचा संकल्प

नागपूर(Nagpur), ८ मार्च :
माणसाला आनंदी राहण्यासाठी घर, शिक्षण, रोजगार, संस्‍कारासोबत मनोरंजनासारख्‍या मूलभूत गोष्टी मिळणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील लोकांसाठी सिने चौरंगी प्रकल्‍पाच्‍या ‘एकल हब’ द्वारे या मुलभूत सुविधा उपलब्‍ध करून देण्‍याचा प्रयत्‍न केला जाणार असून यामुळे येथील लोकांचा हॅपी ह्युमन इंडेक्‍स (सुखांक) वृद्धींगत होईल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्‍यक्‍त केला.

कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्‍या सिने चौरंगी अंतर्गत ग्रामीण महाराष्ट्रात आधुनिक मनोरंजन, शिक्षण आणि ज्ञानाचा संगम घडविणाऱ्या ‘एकल हब’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन शनिवारी नागपूरच्या मिहान परिसरात करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी, अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते श्री. रितेश देशमुख (Riteish Deshmukh), कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे अध्यक्ष व सिने चौरंगी प्रकल्‍पाचे संचालक अतुल शिरोडकर यांची उपस्‍थि‍ती होती. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते दीप प्रज्वलन करून व फित कापून ‘एकल हब’चे उद्घाटन करण्‍यात आले.

मानकर ट्रस्‍ट आणि अतुल शिरोडकर यांच्‍या कार्याचे कौतुक करताना नितीन गडकरी म्हणाले की, सिने चौरंगी हा नॉलेज आणि मनोरंजन यांचा ‘इंटिग्रेटेड हब’ आहे. समाजातील सामाजिक-आर्थिक मागासलेपण दूर करून समाजाची प्रगती व्हावी या संवेदनशील विचारातून हा प्रकल्प उभा राहिला आहे. हा उपक्रम प्रत्येक गावापर्यंत नेण्याचा विचार असून त्यातून महिला व युवकांसाठी कौशल्य विकास, प्रशिक्षण व रोजगार मार्गदर्शनाच्या संधी निर्माण होतील. हा प्रकल्प ग्रामीण भागात सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडविणारा ठरेल.

प्रास्‍ताविकातून अतुल शिरोडकर म्‍हणाले, ३० वर्षांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेने आतापर्यंत विदर्भातील नक्षलग्रस्त भागातील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली असून या भागातील ‘ड्रॉप आऊट’ चे प्रमाण शुन्‍यावर आले आहे. आता ‘एकल हब’ प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत शिक्षण, संस्कृती आणि मनोरंजनाचा संगम साधणारा हा प्रकल्प राहील. मिनी थिएटरची मूळ संकल्‍पना मित्र संजय गायकवाड यांची असून त्‍यांचा ‘एकल हब’ हा विस्‍तार आहे, असे ते म्‍हणाले.

तत्‍पूर्वी, एकल हबची विस्‍तृत माहिती देणारा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्यामल देशमुख यांनी केले तर अतुल शिरोडकर यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी मराठी अभिनेते नाट्य-चित्रनिर्माते, दिग्दर्शक अजित भुरे, कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे पदाधिकारी सीए मिलिंद कानडे, प्रशांत बोपर्डीकर, धनंजय बापट, डॉ. उपेंद्र कोठेकर, मुरलीधर चांदेकर, राजू हडप, अनिल जोशी, निरंजन देशकर, बाळासाहेब अंजनकर, राजकुमार बडोले, भुपेंद्र शहाणे यांची उपस्‍थ‍िती होती.
………
मनोरंजन सुलभ, परवडणारे असावे – रितेश देशमुख
लातूरसारख्या ठिकाणी राहात असताना आम्‍हाला त्‍याकाळी शिक्षण व मनोरंजनासाठी शहरात यावे लागत असे. इतर मुलभूत गरजाप्रमाणेच या देखील माणसाच्‍या गरजा असून त्‍या सुलभ आणि परडणा-या असल्‍या पाहिजे. ‘एकल हब’ हा प्रकल्‍प ग्रामीण भागात मनोरंजनाबरोबरच शिक्षण आणि रोजगाराच्या संधीही निर्माण करेल, असे मत रितेश देशमुख यांनी व्‍यक्‍त केले. अतुल शिरोडकर यांचे कार्य हे बुलेट ट्रेनसारखे वेगवान असून त्यांनी अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय काम केले आहे. सिने चौरंगीने ग्रामीण भागात सकारात्मकता आणण्‍याचे व्हिजन ठेवून ‘एकल हब’ हा प्रकल्‍प हाती घेतला आहे, असे ते म्‍हणाले.
…………..
असा आहे ‘एकल हब’ प्रकल्‍प
या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक प्रोजेक्शन तंत्रज्ञानासह दोन स्क्रीनचे (१२५ व ७५ आसन क्षमता) सिनेमा थिएटर, शिक्षण केंद्र आणि किरकोळ व्यावसायिक जागा यांचा समावेश राहील. या केंद्रांचा ऑपरेटिंग मॉडेल देखील विशेष आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत आरोग्य जनजागृती, कृषी प्रशिक्षण, डिजिटल साक्षरता, कौशल्य विकास, साक्षरता अभियान आणि विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यानंतर ११ ते ६ या वेळेत कुटुंबासोबत पाहता येतील असे मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच इतर प्रादेशिक भाषांतील चित्रपट दाखविण्यात येतील. संध्याकाळी ६ ते १० या प्राइम टाइममध्ये नवीन व लोकप्रिय चित्रपटांचे प्रक्षेपण होईल. यामध्ये प्रामुख्याने मराठी चित्रपटांना प्राधान्य देण्यात येणार असून ग्रामीण प्रेक्षकांना दर्जेदार सिनेमाचा अनुभव मिळणार आहे
प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील सुमारे २० तालुक्यांमध्ये ‘एकल हब’ उभारण्याचे नियोजन आहे. त्यानंतर पुढील टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील इतर भागांमध्येही या केंद्रांचा विस्तार करण्यात येणार आहे.