देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होऊ नये

0

कोलकाता(Kolkata), 15 मे चीनसोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) सैन्याची तैनाती असामान्य आहे. देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाऊ नये असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर(S. Jaishankar) यांनी केले. पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे “व्हाय इंडिया मॅटर्स” या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते.

एस. जयशंकर “व्हाय इंडिया मॅटर्स” या मूळ इंग्रजी पुस्तकाचे कौशिक दास गुप्ता यांनी बंगाली भाषेत अनुवाद केलाय. या पुस्तकाच्या बांग्ला आवृत्तीचे मंगळवारी प्रकाशन झाले. या कार्यक्रमातआपले मनोगत व्यक्त करताना परराष्ट्र मंत्री म्हणाले की, भारत-चीन यांच्यातील 1962 च्या युद्धानंतर राजीव गांधी 1988 मध्ये चीनला गेले होते, जे चीनसोबतचे संबंध सामान्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल होते. आम्ही आमच्या सीमेवरील मतभेदांवर चर्चा करू, पण सीमेवर शांतता राखू, असा स्पष्ट समज होता. भविष्यातही आमचे संबंध कायम राहतील, असे ते म्हणाले. आता जे काही बदलले आहे ते 2020 मध्ये घडले. चीनने अनेक करारांचे उल्लंघन करून आमच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात केले आणि त्यांनी हे अशा वेळी केले जेव्हा आम्ही कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये होतो. तरी देखील भारताने सैन्य तैनात करून प्रत्युत्तर दिले आणि आता गलवानमधील सामान्य तळाच्या स्थितीच्या पुढे सैन्य तैनात केले गेले आहे.

परराष्ट्र मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, एलएसीवर सैन्याची ही अतिशय असामान्य तैनाती आहे. एक भारतीय नागरिक या नात्याने दोन्ही देशांमधील तणाव पाहता आपल्यापैकी कोणीही देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नये, हे आजचे आव्हान आहे. द्विपक्षीय संबंध आणि सीमेवर शांतता परत येण्यावर चीनसोबतच्या उर्वरित समस्यांचे निराकरण अवलंबून असल्याचे जयशंकर यांनी यावेळी सांगितले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा