
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय फिरत्या कला प्रदर्शनीचे उद्घाटन
नागपूर, २० मार्च २०२६ :
प्रसिद्ध कलाकार व माहितीपट निर्माती डॉ. बीना एस. उन्नीकृष्णन यांच्या ‘एक्का – द वन ’ या राष्ट्रीय फिरत्या कला प्रदर्शनीचे उद्घाटन २० मार्च २०२६ रोजी सिव्हिल लाइन्स येथील पत्रकार भवन (प्रेस क्लब) येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले.
त्यांनी डॉ बीना यांच्या कलाकृतींचे कौतुक करताना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. बीना यांनी पाच वर्षांच्या कालावधीत साकारलेल्या ६४ योगिनींच्या समकालीन चित्रांची मालिका या चित्र प्रदर्शनीत सादर केली आहे. ही प्रदर्शनी देशभरातील १६ राज्यांमध्ये आयोजित करण्यात येत आहे. या प्रदर्शनीची सुरुवात यावर्षी कोची येथून झाली होती. देशातील अनेक शहरांमध्ये यापूर्वी ही प्रदर्शनी भरविण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपुरात ही प्रदर्शनी होत आहे. २१ ते २३ मार्च २०२६ दरम्यान ही प्रदर्शनी सर्वांसाठी खुली राहील.
९ व्या ते १२व्या शतकातील योगिनी मंदिरे ही वर्तुळाकार, खुल्या जागेतील रचना असून त्यांनी पारंपरिक सत्ताकेंद्र, लिंगभेद आणि धार्मिक संकल्पनांना आव्हान दिले होते. या वारशावर आधारित डॉ. बीना यांनी चित्रे रेखाटली असून ती पारंपरिक प्रतिमांपलीकडे जाऊन आधुनिक दृश्यभाषेत योगिनींचे पुनर्मूल्यांकन करतात. डॉ. बीना यांची चित्रकला शैली वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्या आपल्या प्रत्येक चित्राची सुरुवात डोळ्यांपासून करतात. कलाकृतींमध्ये भावनिक सखोलता आणि वेगळेपण यावे, हा त्यामागील त्यांचा उद्देश असतो. ‘एक्का – द वन ’ ही प्रदर्शनी योगिनींना केवळ पौराणिक प्रतिमांपुरते मर्यादित न ठेवता स्त्रीशक्ती, ज्ञान आणि विश्वदृष्टीच्या गहन अभिव्यक्ती म्हणून पाहण्याची संधी देते
या प्रसंगी द अॅटेलियर मॅगझिन व कंकाली ट्रस्ट (KT-ACED) च्या संस्थापक डॉ. बीना एस. उन्नीकृष्णन म्हणाल्या,
“योगिनी या केवळ पौराणिक प्रतिमा नव्हत्या; त्या शक्ती, अस्तित्व आणि स्त्रीज्ञानाच्या विविध पैलूंचे प्रतीक होत्या. ‘एक्का – द वन’ द्वारे मी त्या इतिहासाला आधुनिक दृश्यभाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा एक नॉन-कमर्शियल उपक्रम असून, कला, संशोधन आणि संवादाच्या माध्यमातून योगिनी परंपरेचे आधुनिक पिढीशी पुनर्परिचय करून देण्याचा यामागे माझा उद्देश आहे.”
ही प्रदर्शनी सर्वांसाठी विनामूल्य खुली असून कोणतीही कलाकृती विक्रीसाठी उपलब्ध नाही. योगिनी परंपरेचा समृद्ध वारसा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.














