-तर मनपा मुख्यालयाकडे जाणारे रस्ते अडवू,मनपा आयुक्तांना ‘आप’चा इशारा

0

 

नागपूर :नागपूर विद्यापीठ ग्रंथालय परिसरातील कॅनॉल रोड रामदासपेठ येथील गेले अनेक महिने रखडलेल्या पुलाच्या मुद्यावर आम आदमी पार्टीने आक्रमक आंदोलनाची भूमिका घेतली आहे. सोमवारी आपच्या पश्चिम नागपूर विभागातर्फे रामदासपेठ येथे निदर्शने करण्यात आली. महिनाभरात हे काम पूर्ण न झाल्यास मनपा मुख्यालयाकडे जाणारा रस्ता रोखून धरला जाईल असा इशारा मनपा आयुक्तांना देण्यात आला.
आपचे पश्चिम नागपूरचे संयोजक अभिजीत झा यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात जगजित सिंग, शहर संयोजक कविता सिंघल,संघटन मंत्री शंकर इंगोले, महेश बावनकुळे,जावेद अहमद,जॉय बांगड़कर,सचिन लोनकर, मोहशीन खान,संदीप कोवे,आकाश वैद्य आदी पदाधिकारी उपस्थित होते.
8 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे रामदासपेठ येथील नाल्यावरील पुलाची सुरक्षा भिंत वाहून गेली. त्यानंतर महानगरपालिकेकडून हा संपूर्ण पूल पाडण्यात आला. दरम्यानच्या काळात नव्याने पूल बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. तब्बल 8 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात येणार आहे. भाजपचे भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे यांचे पुत्र सिद्धार्थ व भाऊ अनिल मेंढे यांच्या सनी इन्फ्राप्रोजेक्ट प्रायवेट लिमीटेड या कंपनीला मनपाने पूलाच्या बांधकामाचे कंत्राट दिले. ऑक्टोंबरमध्ये यासंबंधीचे कार्यादेश देण्यात आले. मात्र,चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरी पूलाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेली नाही. प्रत्यक्षात 18 महिन्यात या पूलाचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित असतांना कंत्राटदाराचे काम कासवगतीने सुरु आहे. पूलाच्या बांधकामामुळे रामदासपेठकडून महाराजबागकडे जाणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. गेल्या 7 महिन्यापासून हा रस्ता बंद असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शाळकरी मुलांना लांबच्या रस्त्याने जावे लागत आहे, अनेक ज्येष्ठ नागरिकांचे महाराजबाग परिसरात माॅर्निंग वाॅकला जाणे बंद झाले आहे. सिव्हिल लाईन्सकडे जायला हा महत्वाचा रस्ता होता मात्र रस्ता बंद असल्याने वाहनचालकांना लांबचा पल्ला गाठावा लागत आहे. या परिसरात अनेक रस्त्यांची कामे सुरु आहेत त्यातच हा महत्वाचा रस्ता बंद झाल्याने या परिसरातील वाहतूक रामदासपेठेतील छोट्या गल्ल्यांमधून वळवण्यात आली आहे. दिवसभर वाहनांची येजा, गाड्यांच्या हाॅर्नचा कर्णकर्कश आवाज यामुळे रामदासपेठेतील नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
आम आदमी पार्टीने या पूलाच्या बांधकामात होणारा विलंब व कंत्राटदारावर मनपाची मेेहेरबानी हे मुद्दे उचलून धरत मनपाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहे. महानगरपालिकेने कंत्राटदार भाजप नेत्याच्या मुलाच्या हिताऐवजी नागरिकांचे हित जोपासावे. मनपाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहे. मोक्षधाम घाटाजवळ बांधण्यात आलेल्या पूलासाठी 12 महिन्याऐवजी 5 वर्षे लागली. झिरो माईल मेट्रो स्टेशनजवळील डीपी रस्ता तयार करण्यासाठी मनपाला 6 वर्षे लागली. याशिवाय महाराजबागेतून जाणाऱ्या रस्त्यावर पूल बांधण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे हा पूल निर्धारित वेळेत पूर्ण होणार का असा प्रश्न झा यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, हा पूल नेमका कशामुळे खचला याबद्दल महानगरपालिकेने कुठलीही चौकशी न करता दोषींना पाठीशी घातल्याचा आरोपही त्यांनी केला. नाल्यावरील सुरक्षा भिंत पडली असतांना इतर आवश्यक उपाययोजना न करता सरसकट पूल पाडण्याचे कारण काय, हा पूल पाडण्यापूर्वी महानगरपालिकेने तांत्रिक बाजू तपासून पाहिल्या होत्या का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा