..तेच दोन हजारांच्या नोटांच्या निर्णयाविरोधात ओरड करताहेत: माधव भांडारी

0

 

मुंबई : दोन हजारांच्या नोटेचा वापर मर्यादित करण्यात आला आहे , ही नोट रद्द करण्यात आलेली नाही. ज्यांना या नोटा बँकेत जमा करताना त्याचा हिशोब देण्यात अडचण होणार आहे , ती मंडळीच या निर्णयाबद्दल आरडाओरड करत आहेत. सामान्य माणसाची या निर्णयामुळे गैरसोय होणार नाही , असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी सोमवारी केले . भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते . प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, माध्यम विभाग सहसंयोजक ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते. भांडारी यांनी सांगितले की, दोन हजारांची नोट रद्द करण्यात आलेली नाही. तात्पुरती व्यवस्था म्हणून या नोटेचा वापर सुरु करण्यात आला होता. या नोटेची छपाई २ वर्षांपूर्वीच बंद करण्यात आली आहे. त्याची माहितीही सरकारतर्फे व रिझर्व्ह बॅंकेतर्फे वेळोवेळी देण्यात आली होती. या नोटा मागे घेतलेल्या नाहीत. नोटा बदलून घेण्याची मुदत संपल्यानंतरही या नोटा हिशोब देऊन बदलता येणार आहेत. या संपूर्ण निर्णय प्रक्रियेत सामान्य माणसाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही , सामान्य माणसाची नोटा बदलून घेण्याच्या प्रक्रियेतही गैरसोय होणार नाही. असे असताना काही मंडळी केवळ व्यक्तिगत कारणांसाठी या निर्णयाबद्दल गैरसमज पसरवत आहेत.
डिजिटल प्रक्रियेमुळे एकूणच सामान्य माणसाचे रोखीचे व्यवहार कमी झाले आहेत. सामान्य माणसाकडून दोन हजाराच्या नोटा वापरण्याचे प्रमाण अल्प आहे. दररोज प्रति व्यक्ती १० नोटा बदलून घेता येऊ शकतात. सामान्य माणसाकडील या नोटांचे प्रमाण लक्षात घेता तो निर्धारित मुदतीत आरामात या नोटा बदलून घेऊ शकतो. या नोटांचा वापर मर्यादित करण्याच्या निर्णयामुळे सामान्य माणसाचे कोणत्याही पद्धतीचे नुकसान होणार नाही. ज्या लोकांना या निर्णयामुळे आपले नुकसान होण्याची भीती वाटते आहे , तीच मंडळी याविरुद्ध कावकाव करीत आहेत. निर्धारित मुदतीनंतरही नोटा बदलून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी या रकमेचा हिशोब द्यावा लागेल. हिशोब देणे ज्यांना गैरसोयीचे आहे, तीच मंडळी याविरुद्ध आरडाओरड करीत आहेत, असेही भांडारी यांनी नमूद केले.