मोठा भाऊ कोण?.. महाविकास आघाडीत वाद सुरूच

0

 

मुंबई : मोठा भाऊ कोण?
यावरून महाविकास आघाडीत वाद सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीत “आम्ही मोठे भाऊ” असे वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्यावर महाविकास आघाडीतून टीका केली जात असली तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना अजित पवार यांचे मत मान्य आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र जागावाटप मेरिटवर व्हावे, यावर ठाम आहेत.
अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आपल्या पक्षाच्या वाढीकरता प्रत्येक पक्षाचे नेते उत्साहवर्धक वक्तव्य करतात. आजच्या महाविकास आघाडीत विधानसभेच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. काँग्रेस दोन नंबरचा आहे. नंतर उद्धव ठाकरे गट तीन नंबरचा आहे. त्यामुळे त्यात विधान करणे काही चुकीचे नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या काँग्रेसकडे 44, राष्ट्रवादीच्या 54, तर उद्धव ठाकरेंकडे 56 आमदार होते.
संजय राऊत यांनी ठाकरेंची शिवसेना लोकसभेच्या 19 जागा लढवणार असल्याचे म्हटले आहे. तर नाना पटोले यांनी जागा वाटपाचा निर्णय हा मेरिटवर होईल, असे म्हटले आहे. मविआतील ज्या पक्षाचे मेरिट जेथे असेल, त्याप्रमाणे तिथे निर्णय घेतले जातील. पारंपरिक मतदार संघाबाबत म्हणायचे तर वेळेप्रमाणे काही गोष्टी बदलल्या जातात. जागा वाटपाबाबत आम्ही काही समित्या तयार केल्या आहेत. त्यातही मेरिटच्या आधारावर चर्चा होणार असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.